“उद्धव ठाकरेंनी तो खुलासा करावा, मी दबावाला बळी पडत नाही”; राहुल नार्वेकरांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 01:42 PM2023-11-01T13:42:55+5:302023-11-01T13:49:00+5:30
Maharashtra Politics: विधानसभा अध्यक्षांबद्दल बेजबाबदार टीका करण्यामागे एक मोडस ऑपरेंडी आहे, अशी टीका राहुल नार्वेकर यांनी केली.
Maharashtra Politics: शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. यानंतर ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत, आम्ही निकाल देऊन इतके दिवस झाले आहेत तुम्ही काहीही निर्णय का घेतला नाहीत? असे म्हणत नार्वेकर यांना सरन्यायाधीशांनी सुनावले. आमदार सुनील प्रभू (सेना-ठाकरे गट) आणि आमदार जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस-पवार गट) विरुद्ध विधानसभा अध्यक्ष या याचिकांवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे सुनावणी झाली. यानंतर आदेशाची प्रत मिळण्यावरून उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. राहुल नार्वेकर म्हणतात त्यांना आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही. मी शिवसेनेच्या आमदारांना सांगेन की त्यांनी ही प्रत राहुल नार्वेकरांना नेऊन द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याला आता राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरेंनी तो खुलासा करावा
ज्यावेळी मला या आदेशासंदर्भात विचारले गेले, तेव्हा माझ्याकडे त्या आदेशाची प्रत नव्हती. ती संध्याकाळी अपलोड झाली. आता उद्धव ठाकरेंना ही प्रत आधी मिळाली असेल, तर त्याबद्दल तुम्ही त्यांनाच विचारा. आता उद्या सुनावणी असेल तेव्हा पुढील कार्यवाहीबाबत माहिती दिली जाईल. विधानसभा अध्यक्षांबद्दल बेजबाबदार टीका करण्यामागे एक मोडस ऑपरेंडी आहे. विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणून आपल्याला हवा तसा निर्णय करून घेणे हा यामागचा हेतू आहे. पण मी अशा दबावाला बळी पडत नाही. त्यामुळे ज्यांना हा प्रयत्न करायचा आहे त्यांनी करावा. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संध्याकाळी ७ नंतर ती प्रत वेबसाईटवर अपलोड झाली. त्यानंतर ती मला मिळाली. त्यावरून अशा कमेंट्स केल्या जात आहेत. त्यांना जर आदेशाची प्रत इतरांपेक्षा आधी मिळाली असेल, तर त्यांनी तो खुलासा करावा. हेतुपुरस्सर केली जाणारी टीका म्हणजे फक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, या शब्दांत राहुल नार्वेकर यांनी पलटवार केला.
दरम्यान, राहुल नार्वेकरांकडून फेब्रुवारी महिन्यापर्यंत आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल देण्यासाठी मुदत मागण्यात आली होती. मात्र, त्यानंतर लगेच लोकसभा निवडणुका लागत असल्याची बाब शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिली. त्यानुसार न्यायालयाने शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल ३१ जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.