मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होत असून १२ जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. पहिल्या आठवड्यात गुरुवारी, शुक्रवार आणि शनिवारीही कामकाज होणार असून त्यानंतरचे दोन आठवडे सोमवार ते शुक्रवार कामकाज चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २७ जून रोजी पुरवणी मागण्या आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी २८ जून रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
या अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी शुक्रवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांच्या पक्षाचे कुणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील सदस्य आहेत. मात्र, अजित पवारांसह हे दोघेही बैठकांसाठी पुण्यात होते. तर विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीत अजित पवार गटाकडून आमदार सतीश चव्हाण सदस्य आहेत. तेही बैठकीला हजर नव्हते. अजित पवार गटात असलेले नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष या नात्याने बैठकीला उपस्थित होते. परंतु, अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावरील व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाचा हिस्सा नसतात.
अधिवेशनाचे कामकाज १३ दिवस चालणार■ पावसाळी अधिवेशनात एकूण १३ दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमं- डळाचे कामकाज सुरू राहील, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
अधिवेशन किमान तीन आठवडेचालविण्याची विरोधकांनी मागणी असताना सरकारला अधिवेशन गुंडाळायची घाई झाली आहे. सर्व सदस्यांना जास्तीत जास्त बोलण्याची संधी मिळावी तसेच जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी मिळावी यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी सरकारकडे मागणी केली. मात्र सरकारने अधिवेशन केवळ दोनच आठवडे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट
अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांची शक्यतालोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केवळ चार महिन्यांसाठी लेखानुदान मांडण्यात आले होते. आता या अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका लक्षात घेता आणि पुढील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.