राज्यातील उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. आता या अर्जांची पडताळणी, आक्षेप आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जवळपास ८ हजाराच्या वर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात लक्षवेधी ठरले आहेत ते भाजपाचेघाटकोपर पूर्वमधून उभे असलेले उमेदवार पराग शहा. त्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांत तब्बल ५७५ टक्क्यांनी वाढली आहे.
२०१९ मध्ये शहा यांनी त्यांची संपत्ती ५००.६२ कोटी असल्याचे जाहीर केले होते. त्यापूर्वी अडीच वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी त्यांनी दाखविलेल्या संपत्तीपेक्षा ही रक्कम तब्बल १९० कोटींनी कमी होती. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी ६९० कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले होते. परंतू, आता २०२४ मध्ये त्यांना निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात ३३८३.०६ कोटी एवढी प्रचंड संपत्ती दाखविली आहे.
पाच वर्षांत शहा यांच्या संपत्तीत २८८२.४४ कोटी एवढी मोठी वाढ झाली आहे. त्यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे ३३१५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि ६७.५३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. शहा हे पेशाने बिल्डर आहेत.
शहा यांची संपत्ती 2,178.98 कोटी रुपये आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 1,136 कोटी रुपयांची संपत्ती आहे. बहुतांश उत्पन्न हे शेअर्स आणि इतर गुंतवणुकीच्या रूपात आहे. अशाप्रकारे शहा हे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.