Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जागावाटप आणि उमेदवारीवरून महायुती तसेच महाविकास आघाडीत सारेकाही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत कुरबुरी कमी असल्याचे दाखवले गेले असले, तरी खटके उडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरीही मोठ्या प्रमाणात झाली. यातच नवाब मलिक यांचा प्रचार करण्यावरून अजित पवार यांनी सूचक विधान केले आहे.
महायुती सरकारमध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट सहभागी झाल्यापासून नवाब मलिकांवरून महायुतीत खटके उडत असल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला अगदी नवाब मलिक विधानसभेत अजित पवार गटाच्या बाकांवर येऊन बसल्यापासून ते नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर करेपर्यंत भाजपाने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. तर विरोधी महाविकास आघाडीने हाच धागा पकडत भाजपावर हल्लाबोल केला. तसेच अजित पवार गट आणि भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला. भाजपाचा विरोध आणि राजकीय वर्तुळातील दबाव झुगारत अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केली. यावर आम्ही मलिकांचा प्रचार करणार नाही, असे भाजपाने स्पष्टपणे सांगून टाकले. यावर आता अजित पवारांनी भाष्य केले आहे.
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का?
नवाब मलिकांना दिलेली उमेदवारी आणि होणारा प्रचार, याबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत रोखठोकपणे उत्तर दिले. आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना आम्ही घड्याळ हे चिन्हही दिलेले आहे. आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये जाणारच ना. नवाब मलिक यांच्यावर आतापर्यंत फक्त आरोप झाले आहेत. तसेच आरोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांना दोषी कसे ठरवता? अशी विचारणा अजित पवार यांनी केली.
दरम्यान, नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या अणुशक्तीनगर या मतदारसंघातून यावेळची विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द या जागेवरून अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.