लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बाारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध कोणाला मैदानात उतरविणार, याची उत्सुकता असताना शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर केली. युगेंद्र हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास यांचे पुत्र आहेत. भाजप, अजित पवार गट वा अन्य पक्षांमधून आलेल्यांना शरद पवार गटाच्या ४५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यात मंत्री राजेंद्र शिंगणे, हर्षवर्धन पाटील, संदीप नाईक, सुधाकर भालेराव, चरण वाघमारे आदींचा समावेश आहे.
अहेरी (जि. गडचिरोली) या मतदारसंघात विद्यमान मंत्री व अजित पवार गटाचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध त्यांच्या कन्या भाग्यश्री यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काटोल मतदारसंघात माजी मंत्री अनिल देशमुख लढणार की त्यांचे पुत्र सलील देशमुख, ही उत्सुकता होती. मात्र, अनिल देशमुखच लढणार हे स्पष्ट झाले. अजित पवार गटातून शरद पवार गटात गेलेले माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजामधून लढतील. तेथे अजित पवार गटाकडे शिंगणे यांची पुतणी भाग्यश्री यांनी उमेदवारी मागितली आहे, ती दिली गेली तर काका-पुतणीचा संघर्ष बघायला मिळू शकताे.
लाेकसभेनंतर पुन्हा आता विधानसभेलाही पवार कुटुंबात लढत
- लोकसभा निवडणुकीच्या वेळी खा. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार कुटुंबातील दोघींमध्ये लढत झाली होती. सुनेत्रा यांचा मोठा पराभव झाला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र यांच्यात लढत होईल. - युगेंद्र हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाकडून लढत आहेत.
खासदारांची पत्नी अन् माजी भाजप खासदाराचे पुत्र रिंगणात
- माजी खासदार डाॅ. खुशाल बोपचे यांचे पुत्र रविकांत बोपचे यांना तिरोडा (जि. भंडारा) मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बोपचे यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश केला होता. - अहिल्यानगरचे शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी या पारनेरमधून विधानसभा निवडणूक लढतील. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत नीलेश हे या ठिकाणी जिंकले होते.
वहिनी भाजपच्या खासदार, नणंद शरद पवार गटाकडून
- मुक्ताईनगरमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली. त्यांच्या वहिनी व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या रावेरच्या भाजप खासदार आहेत. - रोहिणी या भाजपकडून २०१९ मध्ये लढल्या व पराभूत झाल्या होत्या. या ठिकाणी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. खडसे हे भाजपमध्ये जाणार, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला.
भाजपमधून गेले अन् विधानसभेची उमेदवारी मिळाली
भाजपमधून शरद पवार गटात गेलेले संदीप नाईक यांना अपेक्षेनुसार नवी मुंबईतील बेलापूरमधून उमेदवारी मिळाली. बाजूच्या ऐरोली मतदारसंघात संदीप यांचे वडील व माजी मंत्री गणेश नाईक यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अलीकडेच भाजप सोडून शरद पवार गटात गेले. आता ते या पक्षाकडून इंदापूरमध्ये लढतील. त्यांची लढत अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांच्याशी असेल. लातूर जिल्ह्याच्या उदगीरचे माजी भाजप आमदार सुधाकर भालेराव यांनी अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी देण्यात आली. भालेराव यांचा सामना अजित पवार गटाचे मंत्री संजय बनसोडे यांच्याशी असेल. माजी आमदार चरण वाघमारे यांनी भाजप, बीआरएसनंतर शरद पवार गटात प्रवेश केला होता. ते तुमसरमधून लढतील.