माहिम मतदारसंघ महायुतीत मोठा खेळ करण्याची चिन्हे आहेत. भाजपचे नेते सतत अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत बोलत आहेत. आज तर प्रसाद लाड यांनी भाजपाअमित ठाकरेंचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरून एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपात जुंपली आहे. प्रसाद लाड यांना उमेदवार सदा सरवणकर यांचे पूत्र समाधान यांनी ट्विट करून प्रत्यूत्तर दिले आहे.
सरवणकर माघार घेतील असे वाटते, मात्र भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करू, असे भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. यावर सरवणकर यांनी प्रसाद लाड साहेब, जो माणूस जनतेमध्ये काम करतो आणि जनता ज्याला निवडून आणते त्याला विधानपरिषदेची लालच नसते. दादरमध्ये शिवसेना भाजप युतीचा धनुष्यबाणाचा उमेदवार नसणं हे किती शरमेची बाब होईल हे समजण्यासाठी शिवसैनिक असणे गरजेचे असते. महाराष्ट्रामध्ये काय चित्र जाईल, ज्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म झाला त्या विधानसभेमध्ये धनुष्यबाण नाही, असे ट्विट करत प्रत्यूत्तर दिले आहे.
भाजपाच्या ठाकरेंना पाठिंब्याच्या भूमिकेनंतर आता मोदींची सभा कोणासाठी होणार याचाही प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. यापैकी एक सभा ही मुंबईत होणार आहे. मोदी शिवाजीपार्कवर महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. अशातच मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पाडणाऱ्या माहिम मतदारसंघातच मोदींची सभा होत आहे. यामुळे मोदी माहिममध्ये सदा सरवणकरांसाठी प्रचार करणार की राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेंसाठी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.