Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहेत. आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत असून, अनेक गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. यातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.
मला समजले की, ओवेसी आले होते. ओवेसींनी सभा घेतली. अलीकडच्या काळात ओवेसी पोपटासारखे बोलत आहेत, पण मी ओवेसी यांना सांगितले की, हे हैदराबाद नाही, ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देव, देश आणि धर्मासाठी लढाई लढली आणि मोगलांना चित केले, तो हा महाराष्ट्र आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही रजाकारांचे सरकार पुन्हा इथे आणण्याचे स्वप्न पाहू नका. ओवेसी ज्या रजाकारांना आम्ही या महाराष्ट्रातने घालवले, त्यांना पुन्हा इथे आणण्याचे स्वप्न बघाल तर तुमचे स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाडून टाकू, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. याला ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिले.
फडणवीसांनी माझे नाव घेऊ नये, मनोज जरांगेंचे घ्यावे
पंतप्रधान मोदी म्हणतात की 'एक हैं तो सेफ हैं', तुम्ही १० वर्षे सेफ नाही का? आपण एक आहोत, एकजूट आहोत. त्याच्याकडे काम नाही, ते फक्त डायलॉग लिहितात. पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा उद्देश काय? ते कोणाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत? ते देशाला जोडण्याचा प्रयत्न करत नाहीत, अशी टीका करताना, ते म्हणतात, ओवेसी हैदराबादला जा. महाराष्ट्र कुणाच्या बापाचा आहे का? फडणवीस कोणाच्या विरोधात व्होट जिहाद बोलत आहेत? भाजपावाले महाराष्ट्राच्या विकासावर बोलत नाहीत. फडणवीस माझे नाव घेत आहेत, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव घ्यावे, त्यांचे नाव घेणार नाहीत, कारण माझे नाव घेतल्याने हिंदू-मुस्लीम करता येते. भाजपाने सांगावे मराठ्यांना आरक्षण देणार की नाही? अशी थेट विचारणा ओवेसी यांनी केली.
दरम्यान, अयोध्या हरली तर ते धार्मिक युद्ध होते का? योगी म्हणत आहेत की, बटेंगे तो कटेंगे, ही मुख्यमंत्र्यांची भाषा आहे का? तुम्ही फूट पाडत आहात, बुलडोझरने तुम्ही लोकांची घरे पाडता आहात, अशी टीका ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केली.