Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करून अलीकडेच प्रसिद्धी झोतात आलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी आपला निर्णय स्पष्टपणे सांगितला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही तास आधी नालासोपारा-विरार येथे बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हॉटेल विवांता येथे विनोद तावडे आणि भाजपा उमेदवार राजन नाईक यांची बैठक सुरू होती. तितक्यात तिथे बविआचे कार्यकर्ते पोहोचले आणि विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा मोठा आरोप केला. स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर हे पोहोचले. एका बॅगेतून काही डायऱ्या आणि त्यातील तपशील मीडियासमोर खुला करत ती बॅग विनोद तावडे यांची असल्याचा दावा केला. विनोद तावडे यांना घेराव घालून तिथेच अडकवून ठेवले. त्यानंतर लगेचच हितेंद्र ठाकूर तेथे पोहोचले. विनोद तावडे ५ कोटी वाटण्यासाठी आले आहेत, अशी टीप भाजपातील नेत्याने दिली. २५ वेळा फोन केले. सोडवण्याची विनंती विनोद तावडेंनी केली, असा दावा ठाकूरांनी केला होता. तब्बल चार तासांनी विनोद तावडे हितेंद्र ठाकूर यांच्याच कारमध्ये बसून तिथून रवाना झाले. यानंतर यावरून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर आता हितेंद्र ठाकूर यांनी कोणाला पाठिंबा देणार हे स्पष्ट केले.
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला
राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक आणि विधासभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी महायुतीच्या बाजूने मत दिले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी हितेंद्र ठाकूर यांचे अतिशय निकटवर्तीय आणि बविआ नेत्यांनी भाजपात जाण्याची तयारी सुरू केली होती. यावर हितेंद्र ठाकूर चांगलेच संतापले होते. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. यानंतर विनोद तावडे यांचे प्रकरण झाले. त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांचा पाठिंबा कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. याबाबत बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, सर्वपक्षीय नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. आमच्या लोकांचे हित बघणाऱ्यासोबत आम्ही असू. माझे सर्वोच्च प्राधान्य माझ्या विभागाला असणार आहे. आमचा तालुका, आमचा जिल्हा आणि आमच्या जनतेच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ, असे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमच्या जागांबाबत आम्हाला खात्री आहे. आमच्या जागा निवडून आल्यावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. सत्ता समीकरणे सुरूच राहणार. जोपर्यंत राजकारण सुरू आहे, तोपर्यंत या सगळ्या बाबी होतच राहणार, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. तसेच विनोद तावडे यांची टीप कोणी दिली, असे सातत्याने विचारले जात आहे. परंतु, नेत्यांची नावे घ्यायची नसतात. राजकारणात सिक्रसी पाळायची असते. त्याचप्रमाणे आताही कोणाचा संपर्क झाला, कोणत्या नेत्यांनी संपर्क केला, याबाबत नावे सांगितली जात नाहीत, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांनी भूमिका स्पष्ट केली. ते टीव्ही९ मराठीशी बोलत होते.