यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 07:35 PM2024-11-18T19:35:28+5:302024-11-18T19:37:09+5:30

Yugendra Pawar vs Ajit pawar: अनेक बारामतीकरांनी दोन्ही पवार आपलेच, कोणाला दुखवायचे असा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. परंतू या लोकांना कोणत्यातरी एका पवारांना नाराज करावे लागणार आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Baramati undercurrent this year! Ralleys of both Sharad Pawar, Ajit pawar were crowded, no one was predict who will win | यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

यंदाची विधानसभा निवडणूक भारंभार जाहिराती, फोन-व्हिडीओद्वारे डिजिटली प्रचार अशा हायटेक प्रचारावर झाली आहे. आज प्रचार संपला. राज्यातील सर्वात लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ असलेल्या बारामतीत मोठी फाईट होत आहे. अजित पवार कधी नव्हे ते गावागावात प्रचार करत फिरत होते. तर शरद पवार, युगेंद्र पवार व संपूर्ण पवार कुटुंबीय गावोगावी प्रचार करत होते. यामुळे आता बारामतीकरांच्या मनात काय आहे, याचा कोणालाच थांगपत्ता लागू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

अनेक बारामतीकरांनी दोन्ही पवार आपलेच, कोणाला दुखवायचे असा प्रश्न असल्याचे म्हटले आहे. परंतू या लोकांना कोणत्यातरी एका पवारांना नाराज करावे लागणार आहे. अजित पवारांनी जवळपास ७० ते ८० गावांमध्ये प्रचार केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि शेवटच्या प्रचारसभेसाठी येणारे अजित पवार दिवाळीपासून मतदारसंघातच अडकले गेले होते. तर शरद पवारांनी बारामतीत दिवाळी काळात प्रचार करत आता तुमच्यावर जबाबदारी टाकतो, मी पुन्हा बारामतीत येणार नाही, राज्याच्या दौऱ्यावर जाणार असे सांगत बारामतीकरांवर पुढची जबाबदारी टाकली होती. 

एकंदरीतच पवार कुटुंबीय युगेंद्र पवारांच्या बाजुने गावोगावी फिरत प्रचार करत होते. तर अजित पवार यांचे कुटुंबीय अजित पवारांचा प्रचार करत फिरत होते. दोन्ही पवार जिवाभावाचे असल्याने बारामतीकर यंदा प्रचंड शांत आहेत. दोन्ही पवारांच्या सभांना गर्दी पहायला मिळाली. कोणाचे पारडे जड यावर बारामतीकरांनी काहीच सांगता येत नाहीय, दोन्ही पवार गावोगावी फिरत होते, दोघांच्याही सभांना गर्दी तेवढीच दिसत होती, असे सांगत आहेत. 

अजित पवार जिंकणार की युगेंद पवार या प्रश्नाचे उत्तर हे मतदार आता २० तारखेलाच देणार आहेत. ज्याचा निकाल २३ तारखेला बाहेर येणार आहे. परंतू, एकंदरीतच बारामती अंडरकरंट आहे. अटीतटीची लढाई यावेळी बारामतीत पहायला मिळणार आहे. 

अजित पवारांची जमेची बाजू...

शरद पवारांवर अजित पवारांनी थेट टीका, थोरल्या पवारांवर प्रेम करणाऱ्या बारामतीकरांना खटकतील असे शब्द वापरले नाहीत. याऐवजी शरद पवारांचे निवृत्तीच्या वक्तव्याचा आधार घेत अजित पवारांनी साहेबांनंतर मीच तुमच्यासाठी उभा असणार, कोणतेही काम करण्याची ताकद माझ्यात आहे अशी साद मतदारांना घातली. गावोगावी गाव पुढारी नाराज असले तरी अजितदादांनी बैठका घेतल्या. परंतू, स्वत:वर नियंत्रण ठेवून अजित पवारांनी शरद पवारांना फारशी संधी दिली नाही.

युगेंद्र पवारांची जमेची बाजू...

युगेंद्र पवार हे गेल्या वर्षभरापासून तयारीला लागले होते. यामुळे ते पूर्णपणे शरद पवारांच्या ताकदीवरच अवलंबून होते. शरद पवारांचा उमेदवार म्हणून लोक युगेंद्र पवारांच्या सभांना येत होते. बारामतीला राज्याच्या, देशाच्या राजकारणात मोठी ओळख दिली त्या पवार कुटुंबाचा चेहरा ही एकच जमेची बाजू आहे.

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: Baramati undercurrent this year! Ralleys of both Sharad Pawar, Ajit pawar were crowded, no one was predict who will win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.