काही दिवसांपूर्वी तिसऱ्या महा आघाडीचे नेते बच्चू कडू यांनी महायुती, मविआतील नाराजांना फोडणार अशी घोषणा केली होती. आज अजित पवारांच्या गोटातील आमदाराने महाशक्तीमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवारांनी भाजपाच्या जावयाला आपल्या पक्षात घेऊन तिकीट देत विश्वासघात केल्याचा आरोप अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे.
निवडणुकीच्या अगदी तोंडावर बच्चू कडू यांनी 'परिवर्तन महाशक्ती' नावाने तिसरी आघाडी तयार केली होती. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे मोरगाव जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवारांनी पक्षप्रवेश देत उमेदवारीही जाहीर केली होती. त्यामुळे नाराज असलेले मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सूगत चंद्रिकापुरे यांनी सुरुवातीला शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडेही त्यांनी चाचपणी केली होती. मात्र तिथेही त्यांना विचारात घेतले गेले नाही.
यामुळे त्यांनी आता अखेर बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीमध्ये (प्रहार) प्रवेश केला आहे. यामुळे मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये मी निष्ठावंत म्हणून काम केला आहे. 2014 ची निवडणूक आल्यानंतर सुद्धा मी मतदार संघातून माघार घेतली नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर माझे तिकीट कापले गेले. आता या निवडणुकीत मी माझ्या सामान्य कार्यकर्त्यांसोबत ही निवडणूक लढणार असून राष्ट्रवादी पक्षाला आम्ही नक्कीच धडा शिकवणार असे यावेळी आमदार मनोहर चंदिकापुरे म्हणाले.
माझ्यासोबत पक्षाने अन्याय केला त्याच्यामुळे मी तो भावनिक पत्र माझ्या मतदारसंघातील जनतेला लिहिला असे त्या व्हायरल झालेल्या पत्रावर चंद्रिकापुरे म्हणाले.काय होते पत्रात..."दादा हा 'विश्वासघात' जनतेला 'पटेल'च असं नाही! नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ता बोलतोय. आज माझं तिकीट कापण्यात आल्याचं समजल. मुंबईत येऊनही रिकाम्या हाताने परत यावं लागलं याचं मनापासून दुःख झालंय. दादा, जेव्हा महायुतीत जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला तेव्हा इच्छा नसतानाही आपल्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेऊन मी आणि माझा मतदारसंघ तुमच्यासोबत राहिला. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही माझा विश्वासघात केला. केवळ, माझाच नाही तर माझ्यासह माझ्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील लाखो नागरिकांचा हा विश्वासघात आहे. मीच राष्ट्रवादीचा उमेदवार असेन, असं सांगत मी मतदारसंघातील गावं न गावं पिंजून काढली, येथील जनतेला भेटून आपली भूमिका कशी बरोबर आहे, हे समजावलं. पण, ऐनवेळी माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. दादा, पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट वाटते हो, पण ज्या हातात खंजीर आहे, तो हात आपलाच असल्यावर जास्त वाईट वाटते. दोन दिवसांपूर्वी भाजपचा नेता प्रफुल भाई पटेल यांना भेटला आणि त्यांना पटलं. हे सहजच पटेल असं नक्कीच वाटत नाही, यात मोठी डील झालीय अशीच चर्चा आता मतदारसंघात, जनतेत सुरू आहे. कालपर्यंत मी भाजपचा निष्ठावंत, कट्टर म्हणणार नेता आज सुमडीत आपल्या पक्षात आला, दादा, नेतेमंडळी पक्ष बदलायला मोकळी असते, पण सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता एकनिष्ठतेची अग्निपरीक्षा देत असतो. म्हणूनच, आमच्या इथल्या नेत्याची सख्यासारखी बदललेली भूमिका पाहून वाईट वाटलं. मला आणि माझ्या मतदारसंघातील जनतेलासुद्धा. उद्याच आजसुद्धा मला माहिती नाही, पण मतदारसंघातील जनता हे विसरणार नाही, हा विश्वासघातकीपणा लक्षात ठेवेल, तुम्हाला कदाचित हे पटलं असेल, पण माझ्या लोकांना हे अजिबात 'पटेल' असं नाही. त्यामुळेच याच निवडणुकीत याचा हिशोब होणार आणि जनताच सुफडासाफ करणार. कारण, आता मी जनतेमध्ये जाऊनच दाद मागणार आहे, आता जनतेलाच विधानसभेचं तिकीट मागणार आहे," असे मनोहर चंद्रिकापुरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.