मविआची उमेदवार यादी जाहीर होताच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख संपताच काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते राहिलेले रवी राजा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नाही म्हणून नाराज झालेले राजा भाजपात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जवळपास साडे चार दशके राजा यांनी काँग्रेसचे काम केले होते. ''माझ्या 44 वर्षांच्या काँग्रेस पक्षाच्या सेवेचा आदर केला जात नसल्यावर माझा विश्वास बसला आहे. यामुळे मी सर्व पदांचा, पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात राजा यांनी म्हटले आहे.
राजा हे १९८० पासून युवक काँग्रेसशी जोडले गेले होते. भाजपा-शिवसेनेत महापालिकेतील सत्तेवरून वाद सुरु झाला तेव्हा रवी राजा हे विरोधी पक्षाचे नेते होते. विधानसभेला उमेदवारी मिळावी अशी मागणी राजा यांनी केली होती. परंतू, काँग्रेसने राजा यांना उमेदवारी दिली नाही म्हणून ते नाराज झाले होते.