पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
By दीपक भातुसे | Published: November 14, 2024 10:49 AM2024-11-14T10:49:25+5:302024-11-14T10:50:49+5:30
"माझा भाऊ माझ्यावर फार नाराज आहे, तो आता फारच टोकाचे बोलतोय," असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
विशेष मुलाखत
राजकारणामुळे पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता दूर होईल का? यावर "मला नाही वाटत, मी त्या दृष्टीने कधी विचार केला नाही," असे उत्तर देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार कुटुंब कायमचे दुरावले गेल्याचे एक प्रकारे मान्य केले आहे. 'लोकमत'ला बारामती येथील आपल्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'लोकमत'चे प्रतिनिधी दीपक भातुसे यांना दिलेल्या मुलाखतीत पवार कुटुंबातील आताचे संबंध, बारामती विधानसभेतील लढत, विधानसभा निवडणुकीतील पक्षाची कामगिरी, विरोधकांनी दिलेली आश्वासने यावर रोखठोक भाष्य केले.
प्रश्न : तुमच्या सख्ख्या भावाशी कसे संबंध आहेत ?
उत्तर : माझा भाऊ माझ्यावर फार नाराज आहे, तो आता फारच टोकाचे बोलायला लागला आहे. कशामुळे त्याला असे वाटायला लागले, त्याचा स्वभाव असा का झाला, कळायला मार्ग नाही.
प्रश्न : त्यांच्याशी काही बोलणे झाले तुमचे यासंदर्भात?
उत्तर : नाही, नाही.
प्रश्न : बारामतीची लढाई यावेळी वेगळी आहे. नवख्या उमेदवारासमोर उभे राहून तुम्ही तुमचे राजकीय भवितव्य पणाला लावले, असे वाटत नाही का ?
उत्तर : यावेळी घरातलाच सख्खा पुतण्या उभा आहे. मी राजकीय भवितव्य पणाला लावले असे मला वाटत नाही. ही लढाई आमच्या मतदारांनी हातात घेतली आहे. जसे लोकसभेला त्यांनी ठरवले होते, सुप्रिया सुळे आणि विधानसभेला दादा, त्या पद्धतीने ते करतील.
प्रश्न : पक्षात फूट पडण्यापूर्वी तुम्हा सुप्रिया सुळे आणि तुमच्यात संघर्ष होता ?
उत्तर : पूर्वी तसा संघर्ष कधीच नव्हता. आमच्या पक्षात फूट पडली नाही. सगळे आमदार म्हणत होते, आपण सरकारमध्ये जाऊ, पहिल्या अडीच वर्षांत काहीच कामे झाली नाही. दीड वर्ष कोरोनात गेली. त्यानंतर कुठे कामे सुरू झाली, त्यात परत विरोधी पक्षात बसायचे म्हटले तर त्या सगळ्या मंजूर कामांना स्थगिती दिली गेली. त्यामुळे विकासाकरिता, महाराष्ट्राच्या भल्याकरिता सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला.
प्रश्न : तेव्हा शरद पवारांशी चर्चा झाली होती ?
उत्तर : आमच्या सगळ्यांचे हे म्हणणे आहे, असे पत्र त्यांना दिले होते, त्यांनी सांगितले प्रफुल पटेल, जयंत पाटील, अजित पवारांनी भाजपशी चर्चा करा, कोणती खाती, किती मंत्रिपदे, राज्यमंत्री किती वगैरे.
प्रश्न : ते स्वतः कुठल्या चर्चेत सहभागी झाले होते ?
उत्तर : नाही, त्यांनी आम्हाला तिघांना नेमले होते. त्यांनी सांगितले होते, तुम्ही चर्चा करा, त्यामुळे ते नव्हतेच.
प्रश्न : तासगावात तुम्ही आर. आर. पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्याने तुमच्यावर टीका झाली.
उत्तर : आबांनी त्यात ओपन चौकशी करायला नको होती. चौकशी केली असती, तरी चालले असते. खुल्या चौकशीमुळे मला, माझ्या परिवाराला खूप त्रास झाला. आम्ही तीन-चार वर्षे काय सहन केली ते आम्हालाच माहिती. मी असल्या टीकेला भीक घालत नाही, जे खरे असेल ते बोलत असतो. आर. आर. पाटलांनी केसाने आमचा गळा कापला, असा यातून अर्थ काढायचा का ? असे मी म्हटले होते.
प्रश्न : फुकट देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे का?
उत्तर : तुम्ही ते बघतच आहात.
प्रश्न : ही सुरुवात महायुतीने केली ?
उत्तर : महायुतीने कशी सुरुवात केली ? देशातच सुरुवात झाली. काँग्रेसने २००३ साली मोफत वीज केली आणि एक बिल शून्य रुपयाचे दिले, काँग्रेसने कर्जमाफी दिली, या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत.
प्रश्न : विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर समजा मविआला सत्ता स्थापनासाठी तुमची गरज पडली, तर तुमची भूमिका काय असेल ?
उत्तर : ती गरजच पडणार नाही. महायुतीचे सरकार येणार आहे.
प्रश्न : राजकारणात दूर झालेली घराणी एकत्र आलेली आपण बघितली. तुमच्याच पक्षातील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एके काळी एकमेकांविरोधात संघर्ष केला, पण आता ते एकत्र आहेत. पवार कुटुंबात जी कटुता निर्माण झाली आहे ती भविष्यात दूर होईल, असे आपल्याला वाटते का ?
उत्तर : मला नाही वाटत, मी त्या दृष्टीने कधी विचार केला नाही.
प्रश्न : वेगळे झाल्यानंतर शरद पवारांशी कधी बोलणे झाले ?
उत्तर : जास्त कधी संबंध आला नाही, मी माझ्या कामात व्यस्त, ते त्यांच्या कामात व्यस्त असतात.
प्रश्न : सुप्रिया सुळेंबरोबर संपर्क ?
उत्तर : एक दोन वेळा फोनवर संपर्क झाला तेवढाच.
प्रश्न : यावेळी भाऊबीजेलाही गेला नाही.
उत्तर : भाऊबीजेला मी सकाळी पावणेसातला बाहेर पडलो. मी तेव्हा सांगितले होते की, साडेसहाला जेवढ्या बहिणी येतील, त्यांची भाऊबीज करून मी बाहेर पडणार. तीन बहिणी आल्या, त्यांची भाऊबीज करून मी बाहेर पडलो.
प्रश्न : लोकसभेत कांद्याचा फटका बसला, आता सोयाबीन, कापसाच्या भावाचा प्रश्न आहे.
उत्तर : सोयाबीन, कापसाला भाव कमी असताना आम्ही हेक्टरी ५ हजार रुपये असे दोन हेक्टरपर्यंत १० हजार रुपये देऊन शेतकऱ्यांना मदत केली. याही वेळी आमचे सरकार आल्यानंतर केंद्र सरकारची मदत घेऊन आम्ही शेतकऱ्यांना मदत करू.
प्रश्न : आताही संविधान बदलणार हा मुद्दा राहुल गांधींच्या प्रचारात दिसतोय.
उत्तर : राहुल गांधींना समजायला पाहिजे संविधानाचा मुद्दा केंद्र सरकारशी संबंधित आहे. लोकसभेला त्याचा लाभ झाला म्हणून पुन्हा तेच सुरू आहे. उलट राहुल गांधी जे संविधानाचे पुस्तक दाखवतात त्यातील पाने कोरी होती, हे मिडियाने सांगितले आहे.