Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पुढे जात आहे, तसा राजकीय घडामोडींना वेग येत असल्याचे पाहायला मिळत आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अवघ्या काही तासांत अजित पवार गटात भाजपा आणि काँग्रेसमधून बड्या नेत्यांनी प्रवेश केला आणि विशेष म्हणजे अजित पवार गटाकडून या नेत्यांना विधानसभेसाठी उमेदवारीही जाहीर करण्यात आली.
राज्यातील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर करण्यात येत आहेत. यात संधी न मिळालेले अनेक नेते, पदाधिकारी नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या फुटीनंतर त्या त्या पक्षातून संधी मिळते का, याची चाचपणी अनेक जण करताना पाहायला मिळत आहे. उमेदवारीची संधी न मिळण्याचे संकेत किंवा सदर मतदारसंघ मित्रपक्षाला सुटल्यामुळे लगेचच पक्षांतर करून उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. अशी अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाली आहेत. यातच पुढे आता भाजपातील तीन बड्या नेत्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिकीटही मिळवल्याचे पाहायला मिळत आहे.
काही तासांत अजित पवार गटात अनेक नेत्यांचे इन्कमिंग
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील, सांगलीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर लगेचच या चारही नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केली. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
निशिकांत पाटील आणि संजयकाका पाटील यांनाही उमेदवारी
माजी खासदार संजयकाका पाटील यांना तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी शरद पवार गटाने रोहित पाटील यांना उमेदवार दिली आहे. त्यामुळे आता संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे. तर, भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमधून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जयंत पाटील हे उमेदवार आहेत.
दरम्यान, भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना लोहा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना अजित पवार गटाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. सना मलिक यांना अजित पवार गटाकडून अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.