Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे काही तास राहिलेले असताना भाजपाने काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉइन स्कॅम केल्याचा तसेच परदेशी चलन निवडणुकीत वापरल्याचा मोठा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदान सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी आपल्या निवडणूक प्रचारात बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपाने नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांनी बिटकॉइनचा स्कॅम केल्याचा आरोप केला. भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, परदेशी चलनाचा वापर करून अशा प्रकारे निवडणुकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात असून, याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत आरोप फेटाळले
मतदानाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचे आरोप करणे नेहमीचे झाले आहे. मतदारांची दिशाभूल करण्याची अशा प्रकारची खोटी माहिती पसरवली जात आहे. बिटकॉइन गैरव्यवहाराच्या खोट्या आरोपांविरुद्ध आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग आणि सायबर गुन्हे विभागाकडे फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्यामागील हेतू आणि दुष्प्रवृत्ती पूर्णपणे स्पष्ट आहेत, भारतीय राज्यघटनेने मार्गदर्शन केलेल्या सक्षम लोकशाहीमध्ये अशा प्रथा होत असून, याचा निषेध करणेच योग्य आहे, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिली आहे.
नेमके प्रकरण काय आहे आणि कधीपासून सुरू झाले?
सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे दोघेही क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी आहेत. या दोन्ही नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी बिटकॉइनचा गैरव्यवहार केला, असा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. पुण्याचे माजी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सायबर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भाग्यश्री नवटके हे बिटकॉइन घोटाळ्यात सहभागी होते. तसेच सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचे संरक्षण होते, असा मोठा दावाही पाटील यांनी केला आहे.
२०२२ मध्ये रवींद्रनाथ पाटील यांना केली होती अटक
या घोटाळ्याची तपशीलवार माहिती सांगताना रवींद्रनाथ पाटील यांनी सांगितले की, सन २०१८ मध्ये त्यांची कंपनी KPMG बिटकॉइन क्रिप्टो चलन घोटाळ्यात फॉरेन्सिक ऑडिटसाठी नियुक्त करण्यात आली होती. ते त्याचे नेतृत्व करत होते. सन २०२२ मध्ये याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. १४ महिने मी तुरुंगात होतो. यावेळी मला का गोवण्यात आले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्यांसोबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काम करत राहिलो. अखेर धक्कादायक तथ्ये आमच्यासमोर आली, असे रवींद्रनाथ पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार गौरव मेहता या ऑडिट फर्मचा कर्मचारी असून, त्याने गेल्या काही दिवसांत अनेकदा संपर्क साधला होता. पाटील यांनी प्रतिसाद दिला, तेव्हा मेहता यांनी सन २०१८ च्या क्रिप्टोकरन्सी फसवणुकीच्या तपासाविषयी माहिती शेअर केली. मेहता यांनी आरोप केला की, क्रिप्टोकरन्सी व्यापारी अमित भारद्वाजच्या अटकेदरम्यान बिटकॉइन असलेले हार्डवेअर वॉलेट जप्त करण्यात आले. परंतु, हे वॉलेट बदलण्यात आल्याचा दावा मेहता यांनी केला. पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेवरून वॉलेट बदलण्यात आल्याचा आरोप आहे. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचा दावा मेहता यांनी केला. खरे गुन्हेगार गुप्ता आणि त्यांची टीम असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची नावे घेतल्याचा आरोपही पाटील यांनी मेहता यांच्यावर केला.