Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: हरियाणातून राहुल गांधी यांना नाकारले. तसेच आता महाराष्ट्रातील जनताही मतदानाच्या माध्यमातून राहुल गांधी यांना नाकारेल, धडा शिकवेल. राहुल गांधी हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कधी काँग्रेस पक्ष चालला नाही. महाराष्ट्रातील जनता राहुल गांधी यांच्या नौटंकीला आणि विकृत मानसिकतेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. जाहीरनामे प्रसिद्ध करत आश्वासने दिली जात आहेत. यातच काँग्रेस आणि महाविकास आघाडीही जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. यातच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.
राहुल गांधी संविधान बचावाचे ढोंग करत आहेत
मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी संविधान बचावाचे ढोंग करत आहेत. काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत केले आहे. काँग्रेसला बाबासाहेबांचे विचार कधीच रुचले नाहीत. राहुल गांधी शहरी नक्षलवादाला पाठिंबा देण्यासाठीच आले आहेत. राष्ट्रविरोधी कारवाया करण्यासाठी, त्यांचे समुपदेशन करण्यासाठीच इथे आले आहेत. प्रसारमाध्यमांना तिथे जाऊ दिले जात नाही. अशा कोणत्या चर्चा तिथे होणार आहेत, ज्या तुमच्यापासून लपवून ठेवल्या जात आहेत, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.
शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर आहेत
शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर आहेत. देवेंद्र फडणवीस बोलले ते खरे आहे. तब्बल १६५ च्या वर शहरी नक्षलवादी विचार असलेल्या संघटना, जनतेच्या मनात देशाबद्दल, समाजाबद्दल द्वेष पसरवणाऱ्या, समाजातील वातावरण गढूळ करणाऱ्या शहरी नक्षलवादी संघटना तयार करण्यात आल्या आहेत. १६५ हून अधिक संघटना कामाला लागल्या आहेत. एका बाजूला संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि संविधानाने मीडियाला दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम करायचे, असे त्यांचे सुरू आहे. ते पुन्हा एकदा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी स्वतःच म्हणालेत की, या देशात आरक्षणाची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ८० वेळा तोडण्याचे काम त्यांच्याच काँग्रेसने केले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
दरम्यान, एकीकडे घटनेची प्रत उंचावून दाखवायची आणि दुसरीकडे अराजकतावादी शक्तींच्या पाशात अडकायचे, संविधानाचा आग्रह एकीकडे धरायचा आणि दुसरीकडे या संविधानाला मूठमाती देऊ पाहणाऱ्या शक्तींना गोंजारायचे अशी बेगडी वृत्ती त्यातून दिसते. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली असून ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. घटनेची प्रत ते अनेक प्रसंगांमध्ये दाखवतात. नेहमीच्या निळ्या रंगाऐवजी त्या घटनेच्या प्रतीला लाल कव्हर लावलेले असते. अराजकतावादी आणि अर्बन नक्षलवाद्यांनी राहुल गांधी यांना घेरले आहे. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा असे वाटले होते की चला! काही नाही तर भारत जोडायला तरी निघाले आहेत पण प्रत्यक्षात काय घडले? त्यांच्या यात्रेमध्ये १८० संघटना अशा होत्या, ज्या विध्वंसक मानल्या जातात, हे मी म्हणतो म्हणून नाही तर ते रेकॉर्डवर आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.