Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपाचे कट्टर नेते असलेल्या अनेकांनी बंडखोरी केल्याने भाजपा चिंताग्रस्त झाला आहे. इतकी वर्षे तुम्ही आम्हाला देतो म्हटले पण कधीही उमेदवारी दिली नाही, आता आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याने चिंता वाढली आहे. मित्रपक्षांविरुद्धही भाजपा नेते उभे आहेत. भाजपाविरुद्ध भाजपा असे चित्र बऱ्याच ठिकाणी आहे. यातच आता भाजपातील बंडखोरांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अल्टिमेटम दिला आहे.
चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजपला बंडखोरांनी धक्के दिले आहेत. दिल्ली, मुंबईपासूनच्या नेत्यांनी 'ऑपरेशन समजूत' हाती घेतली असली तरी अद्याप उमेदवारी मागे घेण्याचा शब्द कोणत्याही उमेदवाराने दिलेला नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक तातडीची बैठक घेऊन बंडखोरी शमविण्यासाठी पक्षसंघटनेला सक्रिय केले. अन्य नेत्यांनी उमेदवारांची तातडीने मनधरणी करावी अशा सूचना देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तसेच बंडखोर उमेदवारांच्या निकटवर्तीयांची त्यासाठी मदत घ्या, असे सांगण्यात आले आहे. यातच चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांना इशारा दिल्याचे सांगितले जात आहे.
पक्षातील नेत्यांना भेटण्यात काहीच गैर नाही
दादाराव केचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी अमित शाह यांना भेटून आपला राजकीय प्रवास त्यांना सांगण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणून त्यांची भेट अमित शहा यांच्यासोबत झाली. पक्षातील नेत्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. ९० टक्क्यांपेक्षा जास्त बंडखोर उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र जे उमेदवारी अर्ज परत घेणार नाही, त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाईल. पुढील सहा वर्ष त्यांच्यासाठी पक्षाचे दारे बंद राहतील आणि कितीही प्रयत्न केले तरी निलंबन मागे होणार नाही, असा थेट इशारा बावनकुळे यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, बोरिवली मतदारसंघात भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारीवरून स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत थेट अपक्ष म्हणून अर्ज भरला. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गोपाळ शेट्टी हे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील.