Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मागच्या काळात कापूस, सोयाबीनचे भाव कोसळले. यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली. हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. येत्या काळात हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार, असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या वचनामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महायुतीसमर्थित उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ गोपालनगरात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हितासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला असल्याचेही सांगितले. व्यासपीठावर गुजरातचे मंत्री ऋषिकेश पटेल, खासदार डॉ. अनिल बोंडे, मध्य प्रदेशचे माजी आमदार आत्माराम पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिवसा शेतात काम करीत असतानाच सिंचन करणे शक्य
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांसाठी मोफत विजेचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी ही वीज पुरविली जाईल. रात्री शेतावर पाणी देण्यासाठी जाण्याचीही गरज पडणार नाही. दिवसा शेतात काम करीत असतानाच सिंचन करणे शक्य होईल. कारण दिवसा १२ तास वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी वेगळी कंपनीच उभारली असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
महिलांना तिकिटात सवलतीमुळे तोट्यातील एसटी नफ्यात आली
महिलांना तिकिटात ५० टक्के सवलतीची योजना आणली. एसटी महामंडळाचे लोक आले. त्यांनी एसटी दिवाळखोरीत निघेल, अशी भीती व्यक्त केली. त्यांना काळजी न करण्याचा सल्ला दिला. महिनाभरापूर्वी तेच लोक परत आले. काहीही झाले तरी योजना बंद करू नका अशी गळ घालू लागले. योजना सुरू झाल्यापासून महिला प्रवासी वाढले. तोट्यातील एसटी नफ्यात आल्याचे त्यांनी सांगितले. घरच्या मंडळींना थांबवून निम्म्या तिकिटात लाडक्या बहिणी काम करून येऊ लागल्या आहेत. हा सक्षम बदल असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीवाल्यांच्या डोक्याचे नटच कसतो!
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना ओवाळणी म्हणून दर महिन्याला १५०० रुपये देतो. आम्ही पैसे देऊ असे सांगताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेड्यात काढले. अनेक वल्गना केल्या. हायकोर्टात गेले. कोर्टाने योजना बंद करण्यास नकार दिला. यानंतर आम्ही त्यांच्या नाकावर टिच्चून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यावर दिले. तुमचा आशीर्वाद मिळाला की २१००रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत. महाविकास आघाडीवाल्यांचे हे षडयंत्र थांबविण्यासाठी त्यांच्या डोक्याचे नटच कसतो. मग लाडक्या बहिणींविषयी असले विरोधी विचार त्यांच्या डोक्यात येणार नाही, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शेतकरी म्हणाले, आता पडक्या दराची चिंता मिटली!
बाजारात भाव कोसळले की कुठलेही संरक्षण मिळत नसल्याने अडचण होत होती. अनेकदा घरात शेतमाल पाडून ठेवावे लागत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हमीभावातील फरकाची रक्कम थेट खात्यावर जमा करण्याची घोषणा केल्याने आमची मोठी अडचण दूर झाली आहे. आता गरज असल्यास कमी भाव असतानाही मालाची विक्री करणे शक्य होईल. हा मोठा दिलासा आहे, अशा शब्दांत अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या घोषणेनंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.