Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. रात्री उशिरा आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ६५.११ टक्के मतदान झाले. अनेक एक्झिट पोल आले असून, बहुतांश जणांनी महायुतीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तवला आहे. यानंतर आता महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते कामाला लागले आहेत. निकालानंतर काय जुळवाजुळव करता येऊ शकते, यावर चर्चा सुरू झाल्यात आहेत. अशातच लाडकी बहीण योजनेवरून देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. या योजनेनुसार यातील पात्र महिलांच्या खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कोट्यवधी महिलांनी या योजनेत नोंदणी केली. योजनेतील पात्र महिलांच्या खात्यावर सरकारने सुरुवातीला दोन हफ्ते आणि त्यानंतर आणखी काही महिन्यांचे हफ्ते जमा केले. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढील महिन्यांच्या हफ्ताची रक्कम आगाऊ जमा केली. विरोधकांनी सुरुवातीला या योजनेवर जोरदार टीका केली. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर सरकारकडे पगार, पेन्शन द्यायला पैसे शिल्लक राहणार नाही, अशी ओरड विरोधकांनी केली. मात्र, निवडणूक लागताच त्याच विरोधकांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या योजनेची रक्कम ३ हजार रुपयांपर्यंत वाढवू, असे आश्वासन दिले. तर महायुतीनेही पुन्हा सरकार आल्यास या योजनेची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा शब्द दिला आहे.
‘लाडकी बहीण’योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का?
महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. आजपर्यंतचा अनुभव असा आहे की, जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजपा आणि मित्र पक्षांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे असे यावेळीही होऊन आम्हाला त्याचा फायदा मिळेल आणि महाराष्ट्रात आमचे सरकार स्थापन होईल, अशी अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच बुथवरून माहिती घेतली. त्यानंतर २५ ते ३० मतदारसंघात संपर्क साधला असता महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे, असे लक्षात आले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावरून लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा मतदानाचा टक्का वाढला आहे का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, २३ तारखेला निकाल लागल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि चांगला निर्णय करू. मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढली आहे, त्यानुसार थोडासा मला प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर दिसतो. लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणे हा त्याचा अर्थ होतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.