Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: तेलंगणमधील कामगिरीवर महाराष्ट्रात मते मागितली जात आहेत. महाविकास आघाडीकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यात तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यात आला आहे. मविआच्या जाहिरातीत महाराष्ट्रातील नेत्यांचे फोटो नाहीत. काँग्रेसने आत्मविश्वास गमावला असून, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते, अशी टीका भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
मीडियाशी बोलताना अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या जाहिरातीवरून जोरदार निशाणा साधला. तेलंगणमधील परफॉर्मन्सवर तुम्ही महाराष्ट्रात कशी मते मागितली जाऊ शकतात. तेलंगण सरकारची कामगिरी महाराष्ट्रात कशी दाखवली जाऊ शकते. महविकास आघाडीच्या जाहिरातीत प्रकाशकाचे नाव दिसत नाही, यावर निवडणूक आयोगाने कारवाई करणे गरजेचे आहे. भाजपाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तेलंगणमधील अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक जाहीर केलेल्या योजनांचे पूर्ण पैसेही मिळालेले नाही. काहींना अर्धेच पैसे मिळाले आहेत. तेलंगण काँग्रेसने अनेक आश्वासने दिली होती. पण ते ती आता पूर्ण करू शकत नाहीत. तेलंगणाचे सरकार जे आश्वासने पूर्ण करू शकत नाही. काहीच कामगिरी नाही, त्यांच्या जीवावर महाराष्ट्रात मते मागणे हा प्रकार अगदी हास्यास्पद आहे, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी हल्लाबोल केला.
फेक नरेटिव्हच्या भूलथापांना बळी पडू नका
महाविकास आघाडीकडून अशा प्रकारे चुकीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारांनी फेक नरेटिव्हच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. तसेच बहुमताने महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात स्थापन होईल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढेल तर त्याला विरोध कशाला कुणाचा हवा. लोकांसोबत चर्चा केली की विरोध मावळतो. उद्धव ठाकरेंनी पॉलिटिकल स्टेटमेंट यावरून करू नये. राज्यसभेवर आहे. माझी अजून ६ वर्षे टर्म आहे. राज्यसभेत आनंदी आहे. मग लोकसभेत कशाला जाऊ, माझी मुलगी लढते आहे, मी ही लढावे, मला संयुक्तिक वाटत नाही. संजय राऊत आपण एका पक्षाचे प्रवक्ते आहात, वैयक्तिक पातळीवर न जाता आरोप प्रत्यारोप करावे. जो शिमगा सुरू आहे मतदार याला पसंती देणार नाही, असा खोचक पलटवार अशोक चव्हाण यांनी केला.