Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. केंद्रातील नेते, पदाधिकारी राज्यात येऊन प्रचार करत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चव्हाण कुटुंबीयांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद, देशाचे गृहमंत्रीपद, अर्थमंत्रीपद, संरक्षणमंत्रीपद दिले. स्वत: अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिले, अजून काय द्यायचे आणि तरीही पक्ष सोडून जातात, अशी टीका शरद पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली. पत्रकारांशी बोलत असताना अशोक चव्हाण यांना या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले.
मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत?
शरद पवार नेमके काय म्हणाले हे मला माहिती नाही, पण शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी माझ्यासारख्या लहान माणसावर वक्तव्य केले असेल असे मला वाटत नाही. परंतु, मी जर संधीसाधू आहे, तर मग शरद पवार काय आहेत? या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागेल, असा पलटवार अशोक चव्हाण यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही, त्यामुळे यांचा नुसता गोंधळ चालला आहे आणि असाच गोंधळ राज्यपातळीवर झाला तर, आपण राज्याचा काय विचार करणार, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला.