Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीतील उमेदवारांबाबतचा घोळ पाहायला मिळाला. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असूनही अनेक ठिकाणी उमेदवार निश्चित आणि जाहीर झाले नव्हते, त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसले. तर अनेकांनी उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर नाराजी व्यक्त करत थेट अपक्ष लढण्याचा निर्धार व्यक्त केला. यातच संगमनेर येथील जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली असून, त्यामुळे सुजय विखे यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
संगमनेर येथून शिवसेना शिंदे गटाने अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली नाही, यावर शिक्कामोर्तब झाले. यावर सुजय विखे यांनी प्रतिक्रिया दिली. ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला. ही जागा अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली. नगर जिल्ह्यात कोणती जागा कोणाला जाईल, यावर अनेक दिवस चर्चा झाली. मागच्या पाच वर्षांत आम्ही सर्वसामान्य जनतेचे अनेक कामे केली आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार तिथे दिला आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा काय करून दाखवू शकतो हे २३ तारखेला कळेल, असे सुजय विखे यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संगमनेर तालुक्यात सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर संगमनेरचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत दखल घेतली. राजकीय वर्तुळात विरोधकांकडून याचा कडाडून विरोध आणि निषेध करण्यात आला. यामुळे सुजय विखे यांचा पत्ता कट झाला आणि ही जागा शिंदे गटाला सुटली, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.