BJP Candidate List ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र शेवटच्या दिवसापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू असून ज्या जागांवर तोडगा निघत आहे, तेथील उमेदवार सदर राजकीय पक्षांकडून जाहीर केले जात आहेत. महायुतीच्या जागावाटपात तोडगा निघालेल्या दोन जागांसाठी भाजपने आपल्या चौथ्या यादीत उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये मीरा भाईंदर आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.
भाजपने उमरेड विधानसभा मतदारसंघातून सुधीर पारवे यांना उमेदवारी दिली असून मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांना रिंगणात उतरवलं आहे. भाजपने आतापर्यंत १४८ उमेदवार जाहीर करत ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. यासह भाजप आतापर्यंत १५२ जागांवर पोहोचला आहे.
कोणत्या चार जागा मित्रपक्षांना?
भाजपने बडनेराची जागा युवा स्वाभिमानीला, गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला, कलिना; मुंबईची जागा रिपब्लिकन पक्षाला, तर शाहुवाडीची जागा जनसुराज्य पार्टीला सोडली आहे. बडनेरामध्ये रवि राणा, गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे, तर शाहुवाडीत विनय कोरे हे उमेदवार असतील.
काँग्रेस सोडली, आता ‘भाजप’चे उमेदवार : माजी आमदार दिवंगत रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस) यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र जितेश काँग्रेसकडून पोटनिवडणूक लढले आणि जिंकले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून ठेवण्यात आला होता. त्यामध्ये अंतापूरकरांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ‘भाजप’ने त्यांना देगलूरमध्ये उमेदवारी दिली आहे.