Bacchu Kadu ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालापूर्वी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अपक्षांसह इतर छोट्या पक्षांना संपर्क साधला जात आहे. परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुतीसहमहाविकास आघाडीनेही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बच्चू कडू हे नक्की कोणाच्या बाजूने जाणार, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महायुती सरकारमध्ये बच्चू कडू सहभागी होते. त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान त्यांनी महायुतीपासून दूर जात परिवर्तन महाशक्तीच्या रुपाने तिसरी आघाडी निर्माण केली. या आघाडीला महाराष्ट्रात १५ जागा मिळतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीने बच्चू कडू यांच्या संपर्क साधत त्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
काय आहे बच्चू कडू यांचा दावा? "आमच्या प्रहारचे किमान १० आमदार निवडून येतील. महाशक्ती परिवर्तन आघाडी मिळून १५ आमदार होतील. कोणत्याही आघाडीची सत्ता येईल, अशी आकडेवारी जुळत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत. हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. बाकीच्यांना आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. लहान पक्ष आणि अपक्ष, अशी आघाडी झाल्यानंतर मग सत्तेचं स्वरूप आणि दिशा बदलेल," असा दावा बच्चू कडू यांनी नुकताच केला आहे. प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय?
"उद्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासारखे संख्याबळ मिळाल्यास आम्ही जो सरकार स्थापन करून शकेल, अशा आघाडीसोबत जाणं पसंत करू," अशी प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा कोणाला असणार, हे उद्याच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात, त्यावरच अवलंबून असणार आहे.