Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात प्रचारसभा सुरु आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. महाविकास आघाडीने महिलांसाठी प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये देण्याची मोठी घोषणा केली आहे. या घोषणेवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे आर्थिक गणित सांगत महाविकास आघाडीची ही घोषणा म्हणजे जनतेची फसवणूक आहे असा आरोप केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 'बोल भिडू' या युट्यूब चॅनेलने विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी अजित पवार यांना 'मविआने महिलांना महिन्याला ३००० देण्याची घोषणा केली आहे, शक्य आहे का ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी अर्थमंत्री म्हणून दहावेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. आम्ही महिलांबाबत योजना जाहीर केली तेव्हाच विरोधक आमच्याविरोधात बोलत होते. आता २ लाख ३० हजार महिलांना दिले आहे.आम्ही योजना जाहीर केली तेव्हा अडीच लाख डोळ्यासमोर ठेवले होते. अडीच लाख महिना प्रत्येकी १८ हजार रुपये वर्षाला ४५ हजार कोटी १५०० रुपये महिन्याला असतील तर आहेत. विरोधकांनी ३ हजार रुपये जाहीर केले म्हणजे १ लाख कोटी , आमचा हिशोब ४५ हजार कोटीचा होतो आम्ही जाहीर केले तेव्हा ते आमच्या विरोधात 'पैसे कुठून आणणार? तिजोरीत पैसे कुठून येणार? असं ओरडत होते, असा टोलाही अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.
अजित पवारांनी राज्याचं आर्थिक गणितच सांगितलं
अजित पवार म्हणाले, आपले बजेट साडे सहा लाख कोटींचं आहे. पुढच्यावेळी सात लाख कोटींचं होईल. पुढच्यावेळी बजेट जसं वाढेल, तसं २१ वर्षांच्या महिलाही या योजनेत वाढणार आहेत, त्यामानाने ६५ वर्षाच्या कमी महिला रिटायर्ड होतात. आता काहीजण बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देणार आहेत असं सांगत आहेत. आता त्यात पत काही लाख कोटींची भर पडेल म्हणजे बजेट ७ लाख कोटींचं असलं तर त्यामध्ये सगळ्यांचे पगार, पेन्शन, घेतलेल्या कर्जाचं व्याज यालाच जातात साडे तीन लाख कोटी रुपये. रोहिलेल्या साडे तीन लाख कोटी रुपयामध्ये डेव्हलपमेंट आहे. यामध्ये आता घोषणांचा पाऊस सुरू आहे, ब्रम्हदेव आला तरी या घोषणा पूर्ण होणार नाहीत. सगळ्यांना एसटी फुकट, कशाचा कशालाच मेळ नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.
"विरोधकांनी आता एवढे लोख कोटी रुपये कसे उपलब्ध करणार आहे हे सांगाव.आम्ही सुरु केलेली योजना आहे त्याला ४५ हजार कोटी रुपये लागत होते. १५ हजार कोटी वीजेसाठी लागत होते. आम्ही सगळा हिशोब केला तेव्हा ८० हजार कोटींच्या पुढे जात होता. आता यांनी या सगळ्याच्या दुप्प्ट केला आहे. याचा हिशोब दोन, तीन लाख कोटी रुपयांवर जाईल. हे विरोधक लोकांची फसवणूक करत आहेत. ज्या राज्यात यांनी योजना सुरू केल्या त्या त्यांना बंद कराव्या लागल्या आहेत, असा आरोपही अजित पवार यांनी महाविकास आघाडीवर केला.