Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. एकेका पक्षाच्या उमेदवारी याद्या जशा जाहीर होत आहेत, तसा राजकारणाला आणखी वेग येत आहे. यातच उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा फायदा घेत लगेचच पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच एका सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
महायुतीच्या जागावाटपात कुडाळची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार असून, वैभव नाईक यांच्यावर पुन्हा एकदा ठाकरे गटाने विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात थेट लढत होणार आहे. निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी निलेश राणे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल
महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे, असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला होता. यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीवारी केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु, महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंचा यांच्या मागणीला थारा दिला नाही. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. शिवसेना वाचवण्यासाठी २ वर्षांपूर्वी उठाव केला आणि त्याला ५० आमदारांनी साथ दिली. आताही सर्व आमदार माझ्यासोबत असल्याचा सार्थ अभिमान आहे. आमच्यावर टीका करणारे मला मुख्यमंत्री करा करा म्हणत दारोदारी भटकत आहेत, मात्र यांचा चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल. आम्ही शिवसेना सोडली नाही, तर ती बरोबर नेली, धनुष्यबाण वाचवला. बाळासाहेब असताना सगळे लोक मातोश्रीवर यायचे. आता मात्र दिल्लीतील गल्ल्यांमध्ये फिरावे लागत आहे, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
निलेश राणे यांना ५२ हजारांचा लीड मिळेल
२०१९ ला महायुतीला मतदान झाले होते. तेव्हा धाडस केले आणि राज्यात महायुतीचे सरकार आणले. आम्ही सरकारमध्ये होतो तरीही विरुद्ध दिशेने गेलो. कारण बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी सोडले, त्यांच्याबरोबर आम्ही राहिलो नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्याने बेईमानी केली त्याचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव करणाऱ्या काँग्रेससमोर ज्यानी गुडघे टेकले, त्यांचा पराभव करण्यासाठी निलेश राणे शिवसेनेत आले आहेत. कोकणाच्या विकासात ज्यांनी कायम खोडा घातला त्यांना धडा शिकवायचा आहे. हे विसरु नका. आता कुडाळ, मालवण या ठिकाणी शिवसेना म्हणजेच महायुतीची ताकद वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना कुडाळमधून २६ हजार मतांचा लीड होता. निलेश राणे यांना ५२ हजारांचा लीड मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.