“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 06:23 PM2024-11-19T18:23:25+5:302024-11-19T18:25:32+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विनोद तावडेंचा ६ वर्षांसाठी मतदानाचा अधिकार काढून घेत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवून देणार की हे प्रकरण वॅाशिंग मशीनमधे घालून क्लीन चिट देणार? अशी विचारणा करण्यात आली आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress anant gadgil criticized bjp over money distribution allegations on vinod tawde | “विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल

“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विरारमधील हॉटेल विवांतामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले होते, असा मोठा आरोप बविआने केला. तर या हॉटेलमधून १० लाखांची रोख मिळाली आहे. तसेच अनेक डायऱ्या मिळाल्या आहेत, ज्यात व्यवहाराच्या नोंदी सापडल्याचा दावा स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. तब्बल चार तासांनी विनोद तावडे, राजन नाईक, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर एकाच कारमधून बसून बाहेर पडले. या प्रकरणी आता काँग्रेसकडून खोचक टीका करण्यात आली आहे. 

विनोद तावडे हॉटेलमध्ये असून, पैसे वाटप करत असल्याची बातमी पसरताच ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलला घेराव घातला. हॉटेलमधील एका रुममधून ९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच एक डायरीही सापडली. ही डायरी विनोद तावडे यांचीच असून त्यामध्ये १५ कोटी रुपयांचा उल्लेख असल्याचा आरोप बविआचे नेते क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. यातच काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी खोचक टीका केली आहे. 

‘ना मै खाउंगा ना किसीको खाने दूंगा’ अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना विरार येथे पैसे वाटताना पकडण्याची बातमी ऐकताच फडणवीस यांनी ‘लाडका विनोद’ अशी काही योजना सुरू केली आहे का, अशी खोचक प्रतिक्रिया गाडगीळ यांनी दिली. सन १९८७ साली दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व रमेश प्रभू यांना धर्माचा प्रचारात वापर केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षाकरिता काढून घेतला होता. तसा विनोद तावडे यांचा अधिकार काढून घेत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवून देणार की हे प्रकरणही वॅाशिंग मशीनमधे घालून क्लीन चिट देणार? असा प्रश्न गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी, शामाप्रसाद मुखर्जी , दीनदयाल उपाध्याय यांची परंपरा असलेल्या भाजपाला सध्याच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी ‘चिक्की पासून नाचक्की’ची सुरुवात करत  ‘कुठे नेवून ठेवला आहे हा भाजपा’, असे आता त्यांचेच कार्यकर्ते बोलू लागले आहेत, या शब्दांत अनंत गाडगीळ यांनी निशाणा साधला.

दरम्यान, या संदर्भात निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपा उमेदवार राजन नाईक यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच विनोद तावडे ५ कोटी घेऊन येत आहेत, हे भाजपावाल्यांनीच मला सांगितले. मला वाटले की, विनोद तावडे राजकीय नेते आहे, हे असे छोटे काम करणार नाही. मात्र आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तेव्हा ते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते. विनोद तावडे मला सारखे फोन करत होते. मला सोडवा, माझी चूक झाली, मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत होते. विनोद तावडे यांनी मला २५ फोन केले, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress anant gadgil criticized bjp over money distribution allegations on vinod tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.