Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या युवक मेळाव्यात डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विखे समर्थक वसंत देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. दुसरीकडे, वक्तव्याच्या निषेधार्थ तालुका पोलिस ठाण्याबाहेर झालेल्या ठिय्या आंदोलन प्रकरणी डॉ. जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. यातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांना थेट सवाल केला आहे.
आक्षेपार्ह वक्तव्य करणारे वसंत देशमुख हे जरी आमच्या सभेचे अध्यक्ष होते तरी ते आमचे कार्यकर्ते नाहीत. ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, असा दावा करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकारात अंग झटकले. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनीही राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?
संगमनेरमधील भाजपच्या नेत्यांना विचारा निवडणूक झाल्यानंतर आम्ही कधी राजकारण केले? शिर्डी मतदारसंघात विकास करण्यासाठी काम करायचा आहे, तर होऊन जाऊ द्या तुलना. दोन्ही व्यक्तिमत्व दोन्ही तालुके विकास आणि जनता न्यायालयात सगळे मांडू. आमच्या तालुक्यात नादाला लागू नये. लागल्यावर काय होत ते पाहिले. ही तर फक्त झलक होती. सुजय विखेला विचारायला महिला गेल्या आणि तो महिलांचा अवतार पाहून पळून गेला. अकोले समृद्धी मार्गे शिर्डीत पोहोचले आणि कार्यकर्ते मागे राहिले. तुम्ही जर मर्द होता, तर मग पळाला कशाला? असा थेट सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला.
दरम्यान, कालच्या सभेत त्यांना अश्रू आले. मात्र जया रडली नाही लढली. स्वातंत्र्य सेनानीच्या घरातली मुलगी आहे. एकदा तुलना होऊन द्या, एकदा कुठे दहशत आहे आणि दडपशाही, आणि मग जनता निर्णय देईल मतांच्या रूपाने. विकास कोणी केला कोणी नाही? घाबरायच नाही. स्वातंत्र्य मिळवायचे असेल पुढे यावे लागेल. आमच्या तालुक्यात लोक भांडतात माझ्याशी आणि प्रेम ही करतात. भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे. भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे आणि जयाचा बाप आहे. त्यामुळे घाबरु नका. फसायचे नाही भक्कम राहायचे, असे थोरात म्हणाले.