Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार, असे दावे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या १० नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला आणि काँग्रेसला दणका दिल्याचे म्हटले जात आहे. भाजपाच्या परिचारक गटाचे ३ तर भगीरथ भालके गटाच्या ७ नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांची उपस्थिती होती. आम्ही शरद पवार यांच्या विचाराचे पाईक असून, यापुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार असल्याचा दावा या नगरसेवकांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भक्कमपणे पुढे जातोय
१० नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. शरद पवारांवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भक्कमपणे पुढे जात आहे. भाजपा परिचारक गटाचे ३ तर भालके गटाच्या ७ नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान, भाजपाचे समाधान आवताडे व काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात थेट लढत होईल अशी चर्चा होती. मात्र, अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे सध्या तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र आहे. तसेच या पक्षप्रवेशामुळे अनिल सावंत यांची ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.