काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांची कुणबी समाजाला खुली धमकी; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:22 PM2024-11-19T17:22:43+5:302024-11-19T17:23:58+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विशेष म्हणजे, खासदार धानोरकर या कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mp pratibha dhanorkar open threat to kunbi community video went viral | काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांची कुणबी समाजाला खुली धमकी; व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांची कुणबी समाजाला खुली धमकी; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काही लोक अपक्षांच्या मागे वाहने घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठिमागे राहिला, तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे. माझा विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा लेखाजोखा या काळात घेणार, असा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून कुणबी समाजातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, खासदार धानोरकर या कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. 

वरोरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ खासदार इमरान प्रतापगढी यांची प्रचारसभा झाली. या सभेला खासदार धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला संबोधित करताना त्यांनी हा धमकीवजा इशारा दिला. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

नेमके काय म्हणाल्या प्रतिभा धानोरकर?

खासदार धानोरकर म्हणाल्या की, आज जे लोक माझा विरोध करीत आहेत. माझ्या विरोधात बोलत आहेत. आत्ता मी कुणाला काहीही बोलणार नाही. त्यांनी लक्षात घ्यावे की, लोकसभा क्षेत्रात २८०० गावे आहेत. या गावांतील कोण कार्यकर्ता माझ्या बाजूने होता. कोण विरोधात होता. प्रत्येकाचा आढावा आजही माझ्याजवळ आहे. ही तर एक विधानसभा आहे. फक्त ३०० गावांची आहे. या विधानसभेतील गावनिहाय, घरनिहाय कुणी विरोध केला आणि कोण बाजूने होता याचा चिठ्ठा काढण्यास फार वेळ लागणार नाही. २० नोव्हेंबरला मतदान झाले की, गावनिहाय यादी माझ्याकडे येईल. कोणाला कसे ठेवायचे आणि कुणाला बारीक करायचे याचा सर्व विचार मी या ठिकाणी करून आहे, असा दमही त्यांनी दिला. 

दरम्यान, या मतदारसंघात दिवंगत माजी खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीकडून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. अनिल यांना काँग्रेसकडून उमेदवारी अपेक्षित होती. पण, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाऊ प्रवीण काकडे यांच्यासाठी जोर लावला. यावरून धानोरकर कुटुंबात फूट पडल्याचीही चर्चा आहे.


 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress mp pratibha dhanorkar open threat to kunbi community video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.