“राज्यात महाविकास आघाडी जिंकली, तर दिल्लीतील मोदींची सत्ताही जाईल”; नाना पटोलेंचे भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 05:51 PM2024-11-11T17:51:23+5:302024-11-11T17:53:31+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने गेल्या १० वर्षात काय काम केले, आश्वासनांचे काय झाले, त्याचा हिशोब द्यावा, अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागला आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा. राज्यात महाविकास आघाडी जिंकली तर दिल्लीतील नरेंद्र मोदींची सत्ताही जाईल, असा मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
एका प्रचारसभेत बोलताना नाना पटोले यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, शेतमालाला हमीभाव देऊ तसेच सत्तेत आल्यानंतर पहिली सही शेतकरी कर्जमाफीवर करेन असे आश्वासन दिले होते. सत्तेत येतात नरेंद्र मोदींनी ते सर्व चुनावी जुमले होते, असे सांगत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. आता देवेंद्र फडणवीस मोदींसारखेच शेतकऱ्यांना आश्वासन देत, सत्तेत आलो तर शेतमालाला हमीभाव देण्याची भाषा करत आहेत. ११ वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे, मागील ७.५ वर्ष देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, याकाळात त्यांनी केले, हे आधी सांगावे, बळीराजाला खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करू नका. आता शेतकरी भाजपाच्या या भूलथापांना बळी पडणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे
विधानसभेची ही निवडणूक महत्त्वाची आहे. महाराष्ट्राला भाजपायुती सरकारने संकटात लोटले असून शिंदे, फडणवीस व अजित पवार यांनी दिल्लीत बसलेल्या मोदी, शाह यांना महाराष्ट्र लुटून देण्याचे पाप केले आहे. महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भाजपा महायुती सरकारने भ्रष्टाचार करून शिवाजी महाराज व कोट्यवधी शिवप्रेमींचा अपमान केला आहे. मनुवादी प्रवृत्तींना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.