“महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच मविआचे ध्येय”; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:12 PM2024-10-29T16:12:18+5:302024-10-29T16:14:07+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाना पटोले यांनी भाजपासह महायुतीवर जोरदार टीका केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress nana patole filed nomination form from sakoli and criticized mahayuti govt | “महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच मविआचे ध्येय”; नाना पटोलेंची टीका

“महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच मविआचे ध्येय”; नाना पटोलेंची टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपा सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली, शेतकरी उद्ध्वस्त झाला, महिला सुरक्षित नाहीत पण भाजपा महायुती सरकारला त्याची काळजी नाही. गरिबांना हक्काची जमीन देण्यापेक्षा भ्रष्ट भाजपा सरकारने अदानी, अंबानीला जमीन देण्यास प्राधान्य दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. राज्यात शासकीय व निमशासकीय कर्माचाऱ्यांची भरती आता ठेकेदारी पद्धतीने सुरु करून मागासवर्गीयांचे नोकऱ्यातील आरक्षण संपवले जात आहे. श्रीमंतापेक्षा गरिबांना जास्त कर द्यावा लागतो, हे सर्व पाप भाजपा सरकारचे आहे. महाभ्रष्ट भाजपायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच महाविकास आघाडीचे ध्येय आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत हजारो लोक उपस्थित होते. नाना पटोले यांनी चारभट्टीचा बजरंगबली आणि गोपीपुरी बाबाच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच आईचे आशीर्वाद घेतले. अर्ज दाखल करण्यास जाण्याआधी पत्नीने नाना पटोले यांचे औक्षण केले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एमपीएससी मार्फत सर्व जागा भरल्या जातील तसेच परिक्षेसाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल. परिक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांना लुटले जाणार नाही. महिलांना भाजपा सरकार जी मदत करत आहे त्याच्यापेक्षा जास्त मदत देऊ. महागाई कमी करण्याचा प्रयत्न करु. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराला गाडणाऱ्या भाजपा महायुती सरकाला गाडणे हाच आमचा उद्देश आहे. या सरकारला सत्तेतून खाली खेचून मविआचे सरकार आणण्याचे ध्येय आहे, असे सांगत नाना पटोले यांनी साकोलीतून रणशिंग फुंकले.

भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे

महागाईने गृहिणींचे प्रचंड हाल होत असताना केवळ १५०० रुपये देऊन भाजपा सरकार मदत केल्याचे सोपस्कार पार पाडत आहे. केवळ पैसे देऊन महिलांचा सन्मान होत नाही. काँग्रेस सरकारने वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हिस्सा देण्याचा कायदा करुन महिलांचा सन्मान केला. राज्यातील ६७ हजार महिला बेपत्ता आहेत, त्यावर सरकारला प्रश्न विचारला तर सरकार उत्तर देऊ शकले नाही, महिलांवर अन्याय, अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. आता राज्यातील भगिनींनीच दुर्गा अवतार घेऊन भाजपाच्या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.  

दरम्यान, बदलापुरात भाजपाच्या शाळेत ३-४ वर्षांच्या लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले, लोकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला तरीही शाळेच्या संचालकांवर कारवाई केली नाही. कोर्टाने झापल्यानंतर शाळेच्या संचालकांना अटक केली. भाजपा युतीचे सरकार महिलांना न्याय देऊ शकले नाही. मविआचे सरकार आल्यावर महिला सक्षमिकरणावरही भर देऊ, असे नाना पटोले म्हणाले.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress nana patole filed nomination form from sakoli and criticized mahayuti govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.