“रश्मी शुक्लांना हटवण्यास एवढा वेळ का लागला, निवडणुकीचे काम देऊ नये”; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 05:08 PM2024-11-04T17:08:58+5:302024-11-04T17:09:03+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली होती, अशी टीका काँग्रेसने केली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेससह विरोधकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यावर निर्णय घेत निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उद्यापर्यंत पाठवा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव यांना आयोगाने दिले आहेत. यावर रश्मी शुक्ला यांना निवडणुकीसंदर्भात कामे देऊ नका, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले त्याबद्दल धन्यवाद पण झारखंड व पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकाना तात्काळ हटवले होते, रश्मी शुक्ला यांना हटवण्यास एवढा उशीर का लागला? असा प्रश्न उपस्थित करुन आता रश्मी शुक्ला यांना निवडणुसंदर्भातील कोणतेही काम देऊ नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली होती
रश्मी शुक्ला या वादग्रस्त अधिकारी आहेत, त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत, असे असतानाही देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या फायद्यासाठी रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची बेकायदेशीर मुदतवाढ दिली होती. रश्मी शुक्ला यांच्यामुळे निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे होतील याबदद्ल शंका असल्याने त्यांना पोलीस महासंचालक पदावरून तात्काळ हटवावे अशी मागणी करणारे पत्र निवडणूक आयोगाला २४ सप्टेंबर २०२४ रोजी पाठवले होते, त्यानंतर २७ सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन शुक्ला यांना हटवण्याचे निवेदनही दिले होते त्यानंतरही शुक्ला यांना हटवले नाही. त्यानंतर ३१ ऑक्टोबर व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवले होते. अखेर निवडणूक आयोगाने उशिराने का होईना रश्मी शुक्ला यांना हटवले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. माझ्या मते राज्य सरकारला थोबाडीत देण्यात आली आहे. ज्या व्यक्तीचा कार्यकाळ संशयित आहे आणि त्याच्याबद्दल जाहीरपणे अनेकजण बोलतात. सत्तेचा गैरवापर त्यांच्या संबधित आहे. अशा व्यक्तीला मुदतवाढ देऊन त्यांच्या कार्यकाळात ही निवडणूक घेण्याचा प्रयत्न होता. निवडणूक आयोगाने योग्य निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.