Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागपुर मधील पहिल्याच कार्यक्रमाने भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीसांची पळता भुई थोडी झाली असून घाबरलेल्या फडणवीसांचे ताळतंत्र सुटल्याने ते राहुल गांधींवर खोटे नाटे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदु धर्मात लाल रंग शुभ मानला जातो पण भाजपाला तो ही अपवित्र वाटू लागला आहे. संविधानाच्या पुस्तकाचा रंग लाल, पिवळा का काळा असावा हे ठरविण्याचा अधिकार संविधान विरोधी लोकांना नाही. संविधान वाचवणे भाजपा व फडणविसांना शहरी नक्षलवाद वाटतो का? भारत जोडो यात्रेत राहुलजींसोबत चालणारी मराठी माणसे शहरी नक्षलवादी आहेत का असा सवाल विचारून देवेंद्र फडणवीसांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची माफी मागावी असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी संविधान ‘बचाओ’ची भूमिका हाती घेत संविधानाचे पुस्तक दाखवत असतात. ज्या लोकांनी आरक्षण व संविधानाला विरोध केला, संविधान जाळले त्या व्यवस्थेच्या बाजूला भाजपाच्या शक्तीस्थळाजवळच सुरेश भट्ट सभागृहात राहुल गांधींचा संविधान संमेलन कार्यक्रम झाला, त्यामुळे भाजपाचा जळफळाट झाला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
भाजपाची सर्वांत मोठी अडचण राहुल गांधी आहेत
भाजपाला डाव्या विचारसरणीचे लोक देशाचे विरोधक वाटत असतील तर केरळमध्ये डाव्या पक्षाचे सरकार आहे, पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे डाव्या पक्षांचे सरकार होते, देशात आजही डाव्या पक्षाचे आमदार, खासदार आहेत, त्यांना मतदान करणारे देशविरोधी आहेत का? आणि भाजपाला तसे वाटत असेल तर केंद्रात त्यांची सत्ता आहे, फडणवीसांनी कारवाई करावी. कोणालाही देशभक्तीचे किंवा देश विरोधाचे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार भाजपाला कोणी दिला. भाजपाची सर्वांत मोठी अडचण राहुल गांधी हे आहेत, भाजपा राहुल गांधी यांना घाबरतात. म्हणून मनुवादी विचारसरणीचे हे लोक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत पण राज्यातील जनता सुज्ञ आहे भाजपाला ते त्यांची जागा दाखवतील, या शब्दांत नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
एकीकडे घटनेची प्रत उंचावून दाखवायची आणि दुसरीकडे अराजकतावादी शक्तींच्या पाशात अडकायचे, संविधानाचा आग्रह एकीकडे धरायचा आणि दुसरीकडे या संविधानाला मूठमाती देऊ पाहणाऱ्या शक्तींना गोंजारायचे अशी बेगडी वृत्ती त्यातून दिसते. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली असून ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. घटनेची प्रत ते अनेक प्रसंगांमध्ये दाखवतात. नेहमीच्या निळ्या रंगाऐवजी त्या घटनेच्या प्रतीला लाल कव्हर लावलेले असते. अराजकतावादी आणि अर्बन नक्षलवाद्यांनी राहुल गांधी यांना घेरले आहे. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा असे वाटले होते की चला! काही नाही तर भारत जोडायला तरी निघाले आहेत पण प्रत्यक्षात काय घडले? त्यांच्या यात्रेमध्ये १८० संघटना अशा होत्या, ज्या विध्वंसक मानल्या जातात, हे मी म्हणतो म्हणून नाही तर ते रेकॉर्डवर आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.