Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाचे नेते ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ है’, ‘व्होट जिहाद’ यासारख्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर फूट पाडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत आणि याच महायुतीच्या उमेदवारांमध्ये नवाब मलिकही उमेदवार आहेत, ज्यांच्यावर भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचे आरोप करुन जेलमध्ये टाकले होते. सत्तेसाठी उद्या भाजपा कुख्यात माफिया दाऊदला निवडणुकीत उभे करेल तर त्याला काय सत्ता जिहाद म्हणायचे का? असा संतप्त सवाल विचारून लोकशाही व संविधान मान्य नसणारा भाजपा ‘व्होट जिहाद’चा नारा देऊन मतदारांचा अपमान करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस मविआचे उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारासाठी घाटंजी येथे सभा घेतली. यावेळी नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
सोयाबीन, कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, शेतमालाला हमीभाव देऊ अशी आश्वासने देऊन भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये आहे पण बाजारात ३००० ते ३५०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबिनला ६,००० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. कापसालाही हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहेत, या भावात शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघत नाही. भाजपाच्या सुलतानी सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करताना सोयाबीन व कापसाच्या भावाची आठवण करा व मगच मतदान करा. मविआचे सरकार आल्यानंतर सोयाबीन, कापसाला हमीभावापेक्षा जास्त भाव देऊ, असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले आहे.