Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. आव्हान-पलटवार केला जात आहे. यातच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे.
प्रियंका गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यातच प्रियंका गांधी यांच्या रोड-शोच्या वेळी भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. भाजपा कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना कमळ दाखवले. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तत्पूर्वी प्रियंका गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत थेट खुले आव्हान दिले आहे.
एकदा जाहीर करून दाखवा की...
काँग्रेसच्या काळात कपाशीला ८ हजार भाव मिळत होता, आता ६ हजार रुपये मिळतो, तेच सोयाबीनचे झाले आहे. दूध उत्पादक, कांदा उत्पादक अडचणीत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, औषधे महाग करुन ठेवली आहेत. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला. आपण पुढे जायच्याऐवजी मागे जात आहोत. राहुल गांधी यांनी जातिजनगणना व्हायला हवी, सगळ्यांना न्याय मिळायला हवा, असे म्हटले की, त्यांच्यावर टीका केली जाते. मोदींनी दहा वर्षात काही केले नाही, पण माझ्या भावाने आरक्षणाची मर्यादा हटवणार म्हटले की, त्याला आरक्षणविरोधी ठरविले जाते. तुम्ही माझ्या भावाला आरक्षण विरोधी म्हणत आहात तर तुम्ही एकदा मंचावरुन ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडणार आणि जातिजनगणना करणार असे जाहीर करुन दाखवा, असे खुले आव्हान प्रियंका गांधी यांनी दिले.
दरम्यान, भाजपाने उद्योगपतींची कर्जे माफ केली पण शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत, आदिवासींना सोयी सुविधा सवलती मिळाल्या नाहीत. भाजपाकडून छत्रपती शिवरायांचाही अपमान झाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही पंचसूत्री लागू करु तसेच राज्यातील रिक्त अडील लाख सरकारी जागा भरु, असा शब्द प्रियंका गांधी यांनी दिला.