Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपकडे टीका करण्यासारखे काहीच नसल्याने खोटे बोलून रडीचा डाव सुरू आहे. राज्यात प्रचंड महागाई, बेरोजगारी वाढली असून मोठया प्रमाणात गुन्हेगारी फोफावली आहे. भ्रष्ट महायुतीच्या भूलथापाना बळी पडू नका. राज्यातील महिला असुरक्षित असताना लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महायुती सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी केली.
एका मेळाव्यात बोलताना विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार महंगाई पे वार, म्हणून मोदी सरकारने खोटे बोलून सत्तेवर येताच देशातील मोजक्या उद्योगपतींचे हित जोपासत प्रचंड महागाई वाढविली. तर राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी बहिण योजना आणली पण आता याच योजनेवरून हे भाजपवाले महिला भगिनींना धमकावत आहे. भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत 1500 रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा सांगितले इतकेच नाहीतर त्यांची व्यवस्था करतो अशी धमकी दिली. भाजप काय आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत आहे का? अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली.
लाडक्या बहिणींना भाजपकडून धोका आहे
लाडक्या बहिणींना भाजपकडून धोका आहे, असे चित्र आहे. म्हणूनच महायुती सरकारला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवा. देशातील व राज्यातील हे महापापी सरकार उद्योगपतीचे कर्ज माफ करते पण शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावले आहे. मोदी सरकार आले तेव्हा तर पंधरा लाख देऊ असे आश्वासन दिले आता १५०० रुपये दिले आणि गाजावाजा करत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, ब्रह्मपुरी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे ५ हजार कोटीचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून झगडावे लागले. मतदारसंघातील रस्ते, घरकुल योजना, शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृहे, वाचनालय, गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती यासाठी आमदार म्हणून आपल्या कामाचा लेखाजोगा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला. लोकप्रतिनिधी नाही तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.