लोकसभेत जागावाटपात आघाडी घेतलेल्या मविआमध्ये उशिरा का होईना अखेर विधानसभेचे जागावाटप झाले आहे. महायुती, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी पहायला मिळत आहे. दोन्ही गटात विभिन्न विचारधारेचे, नेहमी एकमेकांना पाण्यात पाहणारे पक्ष एकत्र आलेले आहेत. यामुळे वरच्या पातळीवरच नाही तर स्थानिक पातळीवरही म्हणावे तसे मनोमिलन झालेले नाही. याचा परिणाम जागावाटपाचा वाद, जागावाटपानंतर बंडखोरीच्या पवित्र्यात झाले आहे. लोकसभेला सांगली पॅटर्न खूप गाजला होता. तशीच बंडखोरी आता नाशिक मध्यमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोन्ही आघाड्यांमध्ये तीन-तीन पक्ष आहेत. २०१४ ला आपापली ताकद आजमावण्यासाठी चारही पक्ष वेगवेगळे लढले होते. यावेळी चारही पक्षांच्या नेत्यांना लढण्याची संधी मिळाली होती. २०१९ मध्ये पुन्हा युती-आघाडी झाली व पुन्हा दोन उमेदवार झाले. यानंतर झालेल्या राजकारणात दोन पक्षांची चार शकले झाली आणि दोन्ही गटात तीन तीन पक्ष निर्माण झाले. यामुळे प्रत्येक मतदारसंघात किमान सहा इच्छूक निर्माण झाले. या इच्छुकांनी काही वर्षे तयारीही केली होती. जागावाटपात आपल्या पक्षाच्या पदरात जागा पाडून घेण्यासाठी फिल्डिंगही लावली गेली. शक्तीप्रदर्शन, नाराजी, बॅनरबाजी आदी मार्ग अवलंबिण्यात आले. परंतू, सहापैकी दोघांनाच संधी मिळाल्याने उर्वरित नाराज झाले आहेत.
एवढी तयारी केलेली, आपल्यासोबतच कार्यकर्त्यांचा हिरमोड कसा करणार या विचारातून हे इच्छुक बंडखोरीच्या वाटेवर वळू लागले आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार राहुल दिवे नाराज झाले असून काँग्रेस येत्या दोन दिवसांत निर्धार मेळावा घेणार आहे. लोकसभेला सांगलीत जरा ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात बंड करून काँग्रेसने निवडणूक जिंकली होती, तसाच पॅटर्न नाशिक मध्यमध्ये राबविला जाणार आहे.
काँग्रेसचे राहुल दिवे यांनी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर राहुल दिवे यांनी बंडाचा इशारा दिला असून यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत गीते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताशांचा गजरात वसंत गीते यांचा स्वागत करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी जी जबाबदारी टाकली आहे ती विजय स्वरूपात त्यांना दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी वसंत गीते यांनी दिली आहे .