Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मनसे पूर्ण ताकदीने निवडणुका लढत आहे. राज ठाकरे राज्यभरात दौरे करून प्रचारसभा घेत आहेत. माहीम मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
माहीम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत मैदानात आहेत. यातच महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार न घेतल्यामुळे मनसेचे टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजपाने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला असला, तरी दुसरीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी नेमके काय घडले ते सांगितले.
महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा का दिला नाही?
सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले. मात्र सदा सरवणकरांची समजूत काढण्यास दोघांनाही अपयश आले. यानंतर महायुतीने अमित ठाकरे यांना पाठिंबा का दिला नाही? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर, भाजपा आणि अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहीम येथे अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा होता, परंतु तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले की, त्यांचा उमेदवार उभा न केल्यास ठाकरे गटाला याचा फायदा होईल. त्यामुळे आम्हाला काहीही करता आले नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. एका मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, माहीम मतदारसंघात सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. अगदी शेवटच्या घटकेला सदा सरवणकर यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, राज ठाकरे यांनी भेट नाकारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यात हस्तक्षेप करत सदा सरवणकर यांना माघार घेण्याबाबत सल्ला दिला होता. परंतु, निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाराजीनाट्य, मानापमान आणि अनेक घडामोडी घडत राहिल्या. शेवटी सदा सरवणकर यांची उमेदवारी कायम राहिली. या मतदारसंघातील तीनही उमेदवार जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.