Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:53 PM2024-11-20T20:53:22+5:302024-11-20T20:53:31+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना होत आहे. अजितदादांविरोधात पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक रिंगणात आहेत. आता कोणते काका वरचढ ठरतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 exit poll prediction about who will be the game changer between ncp ajit pawar group and sharad pawar group | Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?

Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ तारखेला लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. तत्पूर्वी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले होते. यानंतर आता अनेक एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. 

२०१९ मध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. परंतु, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडले आणि भाजपासोबत सत्ता स्थापन केली. वर्षभरानंतर हाच कित्ता गिरवत अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार घेऊन सत्तेत सहभागी झाले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपलाच पक्ष मूळ असल्याचे सांगत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जोरदार धक्का दिला. यानंतर शरद पवार यांनी कंबर कसून पुन्हा एकदा राज्यभरात फिरून संघटना वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे शरद पवार इतक्या वर्षांची राजकीय कारकीर्द पणाला लावत आपणच वरचढ असल्याचे दाखवणार की, अजित पवार करेक्ट कार्यक्रम करून भाकरी फिरवणार, हे २३ नोव्हेंबर रोजी समजणार आहे.

अजित पवार भाकरी फिरवणार का?

बहुतांश एक्झिट पोल्सनी महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये इलेक्टोरल एज एक्झिट पोल अंदाजानुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, १८ ते २८ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतात, असा अंदाज पोल डायरीने आपल्या एक्झिटपोलमध्ये वर्तवला आहे. चाणक्यच्या अंदाजानुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २२ पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच MATRIZE च्या एक्झिट पोलच्या अंदाजनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १७ ते २६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी किती ठिकाणी बाजी मारू शकेल?

बहुतांश एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरू शकतो, असे अंदाज वर्तवला आहे. इलेक्टोरल एजच्या अंदाजानुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४६ जागा मिळण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, चाणक्य अंदाजानुसार, ४० पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. MATRIZE च्या एक्झिट पोलच्या अंदाजनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ३५ ते ४३ जागा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले होते. तर शरद पवार यांनी राजकीय कसब पुन्हा एकदा सिद्ध करत दमदार यश पदरी पाडून घेतले होते. लोकसभेनंतर आता विधानसभेला पुन्हा एकदा बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असाच सामना होत आहे. अजित पवार यांच्याविरोधात पुतण्या युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी रिंगणात उतरवले आहे. आता कोणते काका वरचढ ठरतात, याचा निकाल २३ तारखेलाच समजणार आहे.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 exit poll prediction about who will be the game changer between ncp ajit pawar group and sharad pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.