विजय शिवतारेंसारखा हुशार आमदार तुम्ही निवडून दिला होता. मध्ये तुम्ही थोडा गॅपही दिला. नाहीतर चौकार मारला असता. विजयच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यांच्याकडे तुम्हाला जावे लागणार नाही, ते तुमच्याकडे येतील, तुमची कामे करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुरंदर विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार गटाचे संभाजी झेंडे अशी लढत होत आहे. मविआचाही उमेदवार आहे, परंतू अजित पवार आणि शिवतारे यांच्यातील वाद सर्वांना परिचयाचा आहे. गेल्या विधानसभेला शिवतारे कसा निवडून येतो ते बघतो, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यानंतर शिवतारेंनी या पराभवाचा बदला लोकसभेला अजित पवारांच्या पत्नीचा पराभव करून घ्यायचे म्हणून बंड केले होते. यावेळी शिंदेंनीच त्यांच्यात समेट घडवून आणला होता. परंतू, अजित पवारांनी महायुतीत असूनही शिवतारेंविरोधात उमेदवार दिला आहे. यामुळे शिवतारेंसाठी शिंदेंनी जाहीर सभा घेतली आहे.
धनुष्यबाण आम्ही शिवतारेंच्या हाती दिला आहे. आले किती गेले किती शिवतारेंशिवाय पर्याय नाही. आपले सरकार विकासाभिमुख आहे. मविआच्या सरकारने अडीड वर्षांत काय केले. सगळ्याला स्टे, आता म्हणतात सरकार आल्यावर हे बंद करू, ते बंद करू. काय चालू करणार हे सांगा. अगोदरच्या सरकारने चालू केलेली कामे लोकहिताची असतील तर ती चालू ठेवली पाहिजे. अनेक विकासाची कामे होत आहेत, असे शिंदे म्हणाले.
आता अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेंनी सभा घेतल्याने पुरंदरमध्ये काय होणार, यावर अनेकांची उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. श्रीरामपूरमध्येही शिंदे गट आणि अजित पवार गट अशी फाईट महायुतीत रंगली आहे. तिथे काही दिवसांपूर्वी शिंदेंची सभा होती, परंतू ती त्यांनी अचानक रद्द केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे पुरंदरमध्ये शिंदे येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.