Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. धर्मयुद्ध आणि व्होट जिहादवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा मुकाबला करण्यासाठी व्होट धर्म युद्धाने करू असे म्हटले होते. महायुती सरकारविरोधात सज्जाद नोमानी यांनी व्होट जिहादचे आवाहन केले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फक्त महाराष्ट्रच नाही तर केंद्रातील सरकारही अस्थिर करण्याबाबत नोमानी यांनी व्हिडीओत भाष्य केले असल्याचा आरोप करण्यात आला होता.
हिंदू समाजाने न घाबरता याचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला केला पाहिजे
प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले की, दोन राजकीय पक्षांच्या लढाईला धर्मयुद्ध म्हणणे चुकीचे ठरेल. तसेच राजकीय लढतींना व्होट जिहाद म्हणणे चुकीचे ठरेल. कुणाला मतदान करावे, हे सांगण्यासाठी पूर्वी धार्मिक स्थळावरून पत्रक काढले जात होते. पण आता व्होट जिहादसारख्या घोषणा खुलेआम होत आहेत. हिंदू समाजाने न घाबरता याचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला केला पाहीजे. खरा हिंदू हा मानवतेचा पाईक असतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत सर्वांशी समान व्यवहार केला पाहिजे. तसेच अन्यायही कधीच सहन करू नये, असे स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.
दरम्यान, मी हे निश्चित सांगू शकतो की, महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जर इथे हरियाणाप्रमाणेच त्यांचा विजय झाला तर त्यांचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल. त्यानंतर दिल्ली सरकार नव्या आत्मविश्वासाने आपल्या वाईट हेतूंच्या दिशेने मार्गक्रमण करेल. जर महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला, दिल्लीमधील त्यांचे सरकार अधिक काळ टिकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्राचे सरकार नाही, तर दिल्लीही आहे, असे सज्जाद नोमानी यांनी एका व्हिडिओत म्हणत भाजपा विरोधात मतदानाचे आवाहन केले होते.