दिवाळीनंतर खरी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली होती. यंदा घरोघरी प्रचार करण्यापेक्षा डिजिटलीच जास्त प्रचार केला गेला. फारतर दोन-तीन उमेदवारांचे कार्यकर्ते घरा घरात प्रचाराला गेले असतील. परंतू, उमेदवारांच्या रेकॉर्डेड कॉलनी मतदारांना एवढे भंडावून सोडलेले की आज सायंकाळी ५ वाजल्यापासून हे थांबणार आहे. आज पासून प्रचाराच्या तोफा थंडावणार असून कंदील प्रचाराला, पाळतीला सुरुवात होणार आहे.
लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जरा जास्तच करण्यात आला आहे. डिजिटल जाहिरातींनी तर मोबाईलवर धुमाकुळ घातला आहे. एकेका उमेदवाराचे अनेकदा फोन आल्याने मतदार ते फोन उचलून वैतागले आहेत. अनेकदा तुम्ही काही वर्षांपूर्वी वेगळ्या मतदारसंघात खरेदी केली किंवा तिथे राहत असाल तर त्या मतदारसंघातल्या उमेदवारांचेही फोन आलेले आहेत.
पुण्यात तर भाजपा, काँग्रेसचे कार्यकर्ते सोसायट्यांमध्ये तुम्ही इथले मतदार आहात का, असाच पहिला प्रश्न विचारत होते. कार्यकर्त्यांना आपला मतदार कोण हेच माहित नसल्याचे चित्र होते. यामुळे सर्वांच्या दारावरची बेल वाजवून मग तो आपला मतदार नाही हे समजल्यावर मतदानाचा टक्का वाढवा असे हे कार्यकर्ते सांगत होते.
यंदाची निवडणूक आठवड्याच्या मधल्याच दिवशी ठेवल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा निवडणूक आयोगासह विविध पक्षांनी ठेवली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी किती मतदारांना घराबाहेर काढण्यात यश मिळते यावर सारे गणित अवलंबून असणार आहे. मतदार यादीत नाव आहे की नाही याचे संदेश हायटेक झालेल्या बड्या पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या मोबाईलवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती न मिळाल्यास निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर किंवा मतदान केंद्रा बाहेरील त्या त्या पक्षांच्या बुथवर ही माहिती मिळणार आहे.