चार महिन्यांनी पद मिळाले असते, म्हणून घरच मोडायचे का? शरद पवारांचा अजितदादांबाबत दावा, प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 02:56 PM2024-10-29T14:56:42+5:302024-10-29T14:57:31+5:30
Sharad Pawar Attacks on Ajit pawar: सत्ता नाही म्हणून या लोकांनी साथ सोडली. काही लोकांनी तर उद्योगच केला. पहाटेच जाऊन राज्यपालांना उठविले, कशासाठी? असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला.
अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघातील सभेत भावूक होऊन डोळ्यात अश्रू आणण्याची शरद पवार यांनी आज बारामतीतच नक्कल करून दाखविली आहे. यानंतर शरद पवारांनीअजित पवारांच्या घर फोडण्याच्या आरोपावर प्रत्यूत्तर दिले आहे.
या निवडणुकीत नव्या पिढीला निवडून द्या, आम्ही युगेंद्रचा निर्णय घेतला आहे. मी तेव्हा मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली आणि नव्या पिढीच्या हातात पक्षाचा अधिकार दिला. सत्ता नाही म्हणून या लोकांनी साथ सोडली. काही लोकांनी तर उद्योगच केला. पहाटेच जाऊन राज्यपालांना उठविले, कशासाठी? असा टोला शरद पवार यांनी अजित पवारांना लगावला.
अनेकांना मंत्री केले, पदे दिली. सुप्रियाला कधी एकतरी पद दिले का? तिनेही कधी मागितले नाही. कारण घर एकत्र ठेवण्याचे काम आम्ही केले. तुम्हाला चार महिन्यांनी पद मिळालेच असते, पण पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असते का? असा सवाल करत घर मोडणे माझा स्वभाव नाही, असे प्रत्यूत्तर शरद पवारांनी अजित पवार यांच्या घर फोडण्याच्या आरोपांवर दिले.
राष्ट्रवादी हा पक्ष कोणी काढला, मी. काही लोकांनी आमच्यावरच खटला दाखल केला. हा पक्ष माझा नाही तर त्यांचा असल्याचा दावा केला गेला. कोर्टाने माझ्या नावे समन्स काढले. मी समन्स कधी पाहिला नव्हता. कधी कोर्टात गेलो नव्हतो. कोर्टाने निकाल दिला पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याचे, याच्याशी सरद पवारांचा काही संबंध नाही. आम्हाला नवीन चिन्ह दिले गेले, आम्ही त्यावरही मते मागितली, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार काय म्हणालेले...
आई सांगतेय, माझ्या दादाच्या विरोधात कोणीही फॉर्म भरू नका. या पद्धतीने जे चाललंय ते बरोबर नाही. मग, याबाबत कुटुंबातील मोठ्या व्यक्तीने यामध्ये सांगायला पाहिजे होते. त्यांना फाॅर्म भरायला कोणी सांगितला होता, ‘साहेबां’नी सांगितले, मग आता साहेबांनी तात्यासाहेबांचे घर फोडले, असे म्हणायचे का? या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला; यावेळी अजित पवार यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.