"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 08:42 AM2024-10-26T08:42:23+5:302024-10-26T08:43:45+5:30
Maharashtra Assembly Vidhan sabha Election 2024: जिल्ह्यात 11 तालुके आहेत आणि मला 11 भाऊ आहेत. त्यामुळे मी कुठे कुठे किती उमेदवार उभे करू शकतो विचार करा, असा इशारा माजी आमदार दिलीप माने यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.
मविआमध्ये सोलापूर दक्षिणमधून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी ही जागा काँग्रेसला न सुटल्याने बंडखोरीचे संकेत दिले आहेत. ही जागा उद्धव ठाकरे गटाला गेल्याने माने नाराज झाले असून त्यांनी १९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..? असा उद्विग्न सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारला आहे.
प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र आपण प्रचार केला होता. शिंदे साहेबांचा पराभव मुलीच्या रूपाने मोडून काढला. सर्व सर्वेच्या माध्यमात आपण कुठेही मागे नाही. आपल्या प्रतिस्पर्धी आणि आपल्यात 25% चा फरक आहे. त्यात एक नंबरला दिलीप माने आहे. आपल्या मित्र पक्षाचा सर्वे झाला की नाही ते माहितीच नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा सर्वे झालाय का हे आधी पहायला हवे असे ते माने म्हणाले.
1967 ला माझ्या बापाने बंडखोरी केली आणि आमदार झाले. २०१४-१९ पर्यंत दुसऱ्या पक्षात गेलो होतो. पण मी तिथे रमलो नाही. आम्ही काय बंडखोरीच करायची का..? मला आमदाराकीचे तिकीट मिळाले तर येणारी महापालिका आणि जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात येईल. आपल्या मित्र पक्षाला तिकीट दिल तर ती निवडून येणारी जागा आहे का..? असा सवाल माने यांनी मविआच्या नेत्यांना केला आहे.
सत्ताधाऱ्यांकडून त्रास देणे सुरू आहे, तरीही मी सर्व ग्रामपंचायतींना साथ दिली आहे. बूथ पासून आपण तयारी केली आहे. 3,80,000 मतदान दक्षिण सोलापुरात आहे. त्यामुळे इथे भाजप आणायचे आहे की काँग्रेसला आणायचे आहे, असा सवाल करत 2014 ला भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांना कसे पराभूत करायचे हे मला माहिती आहे, असे ते म्हणाले.
जिल्ह्यात 11 तालुके आहेत आणि मला 11 भाऊ आहेत. त्यामुळे मी कुठे कुठे किती उमेदवार उभे करू शकतो विचार करा. हा माझा अपमान नाहीये, तुमचा आहे. मालकांचे कस होईल म्हणून लोक रडतायत, असा टोला लगावत मी किती सहन करू, आता फक्त दक्षिण नाही, कुठं कुठं भरायचं ते मी ठरवतो, अशा शब्दांत माने यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे.