Vidhan Sabha Election 2024: जिंकविण्यासाठी आलेले आता पराभवासाठी ताकद लावताहेत
By अविनाश कोळी | Published: November 14, 2024 06:24 PM2024-11-14T18:24:53+5:302024-11-14T18:31:40+5:30
राजकारणातला गोंधळ सामान्यांना संभ्रमात टाकणारा
अविनाश कोळी
सांगली : दोनाचे चार पक्ष झाल्यानंतर राज्यातच नव्हे तर जिल्ह्यातील राजकारणात तत्त्वांचा गोंधळ उडाला आहे. ज्यांच्या विजयासाठी मागील निवडणुकीत मतदारांना आवाहन केले होते आता त्याच्या पराभवासाठी नेत्यांना ताकद लावावी लागत आहे. दुसरीकडे ज्या उमेदवारांना व नेत्यांना टिकास्त्रांनी घायाळ केले, आता त्यांचेच गोडवे गाण्याची वेळही काही नेत्यांवर आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत यंदा राजकारणातला हा ‘गोंधळात गोंधळ’ चित्रपट तुफान चालला आहे.
राष्ट्रवादी व शिवसेनेत विभाजन झाल्यानंतर जिल्ह्यातही दोन्ही पक्षांच्या बाजूने नेत्यांची, कार्यकर्त्यांची विभागणी झाली. दोन पक्ष सत्ताधारी महायुतीत, तर अन्य दोन पक्ष महाआघाडीत सामील झाले. यामुळे मित्रांचे शत्रू व शत्रूचे मित्र, असे नवे राजकीय रसायन जनतेसमोर आले आहे.
निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना नव्याने तयार झालेले राजकीय रसायन लोकांची संभ्रमावस्था वाढविणारे ठरत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांचा प्रचार केला आता त्यांच्या पाडावासाठी ते धडपड करत आहेत. याउलट ज्या भाजपविरोधात त्यांनी रान उठविले होते आता त्यांच्याच उमेदवाराचा प्रचार करण्यात ते व्यस्त दिसताहेत.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी खानापूर येथील ज्या उमेदवाराच्या विजयासाठी धडपड केली आता त्यांच्याच गटातील उमेदवाराच्या पराभवासाठी त्यांची फौज काम करीत आहे. पलूस-कडेगावमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी काँग्रेस उमेदवाराविरोधात निवडणूक लढविली होती आता तेच उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारकार्यात सहभागी आहेत.
स्थानिक पातळीवरही भूमिका बदलल्या
सांगलीतील प्रा. पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मागील निवडणुकीत भाजपविरोधात काम केले, आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे भाजपच्या प्रचारात सहभागी आहेत. मिरजेत आमदार इद्रिस नायकवडी यांनी पूर्वी भाजपविरोधात काम केले ते आता भाजपचे मित्र बनलेत. हीच स्थिती जिल्ह्याच्या अन्य मतदारसंघातही कमी-अधिक प्रमाणात आहे.
पडळकरांच्या भूमिकेत बदल
मागील काही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूरमधून बाबर गटाविरोधात निवडणुका लढविल्या होत्या. आता त्यांचा गट महायुतीचा घटक म्हणून त्यांच्या प्रचारात सक्रिय आहे.