“३५ वर्षे काँग्रेसचे काम केले, नाना पटोलेंनी अन्याय केला”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 01:58 PM2024-11-09T13:58:02+5:302024-11-09T14:00:35+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नाना पटोले यांनी निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले होते. पण उमेदवारी दिली नाही. ३५ वर्षे निष्ठेने सेवा करणाऱ्यांवर अन्याय केला, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीचे केंद्रातील आणि राज्यातील नेते राज्यभर प्रचारसभा घेत असून, महाविकास आघाडीचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व महाराष्ट्रभर सभा घेताना पाहायला मिळत आहे. भाजपा, काँग्रेससह अन्य अनेक पक्षांनी बंडखोरांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
मी गेल्या ३५ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून काम केले. या ३५ वर्षांच्या कार्यकाळात पक्षाला कधीही सोडून गेलो नाही. काँग्रेसचे अनेक नेते हे पक्षाला सोडून गेले. पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारीची तयारी करण्यास सांगितली. गेल्या ३५ वर्षांपासून पक्षाचा एकनिष्ठ पाईक असल्याने आपल्याला उमेदवारी मिळेल, याचा विश्वास होता. पण नाना पटोले यांनी माझ्यावर अन्याय केला. त्यांच्यामुळे माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त झाले, अशी टीका अपक्ष उमेदवार प्रेमसागर गणवीर यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.
अपक्ष उमेदवार म्हणून ही विधानसभा निवडणूक लढत आहे
यामुळेच पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन दलित समाजाच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून ही विधानसभा निवडणूक लढत आहे, असे प्रेमसागर गणवीर यांनी म्हटले. प्रेमसागर गणवीर हे भंडारा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. भंडारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने पूजा ठवकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीकडून नरेंद्र भोंडेकर यांना उमदेवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात अनेकांनी बंडखोरी केल्याने अपक्षांचेही मोठे आव्हान पाहायला मिळणार आहे.