Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांना सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे सभा होत आहे. या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने गेले आहेत, यावेळी हेलिपॉडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांना तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर सभेत उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी हेलिकॉप्टरने आलो तेव्हा आठ, दहा जण माझ्या स्वागतासाठी आले होते. म्हटलं काय करायचं आहे. ते म्हणाले, बॅग तपासायची आहे, मी म्हणालो तपासा. त्यांचा व्हिडीओ काढला आहे. एक लक्षात घ्या तुम्हाला कुठेही चौकशीसाठी किंवा तपासणीसाठी अडवले तर त्यांचीही चौकशी करा. ते कुठे नोकरीला आहेत हे तपासा. जसे ते आपले खिसे तपासतात तसे त्यांचेही तुम्ही खिसे तपासा कारण हा आपला अधिकार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
"मी यंत्रणेला सांगत आहे की मी अजिबार रागावलो नाही. तुम्ही तुमच काम करताय, मी माझ काम करतोय. यानंतर मी त्याला म्हणालो मोदी आणि शाहांची बॅग तपासली का? एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला हवी की नको?, असा सवाल करत टोलाही लगावला.
उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही. त्यांना हेच सांगायचे आहे की, त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचे टकमक टोक बघितले नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचे आहे. रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी २३ तारखेचे गुवाहाटीचे तिकीट काढून द्यावे, कारण एकाला तिकडे पाठवायचे आहे. मग त्यांनी तिथे झाडे, डोंगर मोजत बसावे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापू यांचे नाव न घेता लगावला.
दरम्यान, महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजपा त्यांना काश्मीरमधील ३७० रद्द केल्याचे आणि राम मंदिर बांधल्याचे सांगत आहे. राज्यातील मुलभूत प्रश्नांवर भाजपा बोलत नाही. महायुतीकडून मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातील सात बाराही अदानींच्या नावे होऊ शकतो, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.