Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता दोन्ही गट एकमेकांविरोधात निवडणुका लढत आहेत. तर दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवार यांचा आणि शरद पवार यांचा असे दोन पाडवा कार्यक्रम पाहायला मिळाले, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी काटेवाडी येथील पाडवा कार्यक्रमाला भेटी दिल्या. यावेळी आमदार नरहरी झिरवळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देण्यास टाळले.
आमदार नरहरी झिरवळ यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना झिरवळ म्हणाले, बारामतीमध्ये एक पाडवा ही परंपरा रहायला हवी होती, पण राजकारणात दोन गट झाले यात दोन पाडवेही झाले. एकूण बारामतीकरांना अजित पवार यांचा पाडवा भावलेला दिसतो. मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे. आम्ही शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने आले आहोत, दुसरा म्हणजे काँग्रेस आणि तुतारी गटातून अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत, असंही झिरवळ म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी नरहरी झिरवळ यांना शरद पवार यांनी महायुतीवर केलेल्या टीकेवर प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना नरहरी झिरवळ म्हणाले, शरद पवार यांचं नाव घेतलं की अंगावर काटा येतो. त्यांचं नाव कशाला घेता. शरद पवार यांनी एखादी गोष्ट सांगितली की त्यावर मी बोलायचं एवढा मोठा मी झालेलो नाही. त्यामुळे शरद पवार यांचं नाव घेतलं की सगळंया महाराष्ट्राला वाटतं आता काय त्यामुळे मी किरकोळ माणूस आहे, असंही आमदार नरहरी झिरवळ म्हणाले.
'आमच्या इकडे सिंचनाचा मोठा फायदा झाला'
राज्यातील सिंचनावर बोलताना आमदार झिरवळ म्हणाले, आमच्या इथला सिंचन प्रकल्प त्या चर्चेत असलेल्या घोटाळामध्ये होता. पण तो प्रकल्प सुरू झाला होता तेव्हा त्याची किंमत ६० कोटी होती, त्यानंतर त्याचा डीएसआर वाढत २ हजार कोटी झाला. म्हणजे तो भ्रष्टाचार झाला का? इकडे लोक याला भ्रष्टाचार म्हणतील पण आमच्या इकडे याला भ्रष्टाचार म्हणणार नाहीत कारण पाणी आलंय, असंही आमदार झिरवळ म्हणाले.