“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 06:07 PM2024-11-18T18:07:54+5:302024-11-18T18:08:33+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शरद पवारांनी केलेली टीका आणि युगेंद्र पवारांना दिलेली उमेदवारी याबाबत काही बोलणार नाही. बारामतीकर अजितदादांसोबत आहेत, असे जय पवार यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आता मतदानादिवशी जनतेचा कौल कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे, हे बारामतीकरांनी ठरवले असल्याचे जय पवार यांनी म्हटले आहे.
बारामतीकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बारामतीकरांना यावेळी अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे आहे. सगळ्या बारामतीकरांची हीच भावना आहे. सगळे बारामतीकर पवार कुटुंबावर प्रेम करतात. लोकसभेला शरद पवार यांच्यासोबत बारामतीकर होते. परंतु, आता आम्ही सगळीकडे फिरत आहोत, तेव्हा विधानसभेला जनता अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार हे बारामतीकरांनी ठरवलेले होते, असे जय पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांना २ लाखांचा लीड मिळून विजयी होतील
अजित पवार यांना २ लाखांचा लीड मिळून विजयी होतील. प्रत्येकाचे विचार स्वतंत्र असतात. युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा होता. अजित पवार यांचा ताफा अडवत तुम्हीच उमेदवार हवे, असा आग्रह बारामतीकरांनी धरलेला होता. त्यामुळे बारामतीकरांची आशा अजित पवार यांच्यासोबत आहे. पवार कुटुंबातील संघर्ष टाळता आला असता का, यावर काही बोलू शकत नाही. टीका करू शकत नाही. तो निर्णय त्यांचा होता, असे जय पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्याकडे अजून २५ वर्षे काम करण्याची क्षमता आणि शक्ती आहे. बारामतीकरांचा विकास अजित पवार यांनी केला आहे. भविष्यातही बारामतीकर आणि अजित पवार हे समीकरण एकत्रच असलेले दिसेल, असा विश्वास जय पवार यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, बारामती मतदारसंघात शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली असून, पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभेला अपयश आल्यानंतर आता विधानसभेला जनता अजित पवार यांच्या पारड्यात मतांचे दान टाकून विजयी करणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.