Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. १६० पेक्षा जास्त जागा येणार आहेत. बारामतीत युगेंद्र पवार निवडून येतील. एक मताने का होईना पण युगेंद्र आमदार होतील, असे आव्हाड म्हणालेत. तसेच भाजपाकडे प्रचंड पैसा आहे, निवडणुकीत त्यांनी कोटींच्या कोटी वाटले, त्यामुळे आताही ते पैसे वाटणार, अपक्ष आमदारांना पैसे देणार, भाजपाला अजून काय येते, अशी खोचक प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली.
नारायण राणेंना आव्हाडांचे प्रत्युत्तर
शरद पवार दोन तऱ्हेचे आहेत. कुठल्याही क्षणी त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी शरद पवार राज्याच्या हिताचा निर्णय घेऊ शकतात, असे मला वाटते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत. शरद पवार महायुतीसोबत हातमिळवणी करु शकतात, असा दावा नारायण राणे यांनी केला. यावर बोलताना, नारायण राणे यांना सल्ला आहे, तुम्ही किती पक्ष बदलले ते बघा, तीन पक्ष बदलेल्या माणसाने शरद पवारांना सांगू नये, तुम्ही तुमचे बघा, असे प्रत्युत्तर आव्हाडांनी दिले.
दरम्यान, गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही, असा खोचक टोला लगावत, शरद पवार मला जे काम करायला सांगतील ते मी करणार, मी काही मागितले नाही, मी कधी मागणार नाही, असे आव्हाडांनी स्पष्ट केले.